केंद्रीय गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून वेगवेगळय़ा विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी आणखी एक ‘चूकभूल’ केली. भंडाऱ्यातील बलात्कार प्रकरणावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना पीडित मुलींची नावे जाहीर करून शिंदेंनी कायद्याचाच भंग केला. विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी आपली चूक मान्य केली आणि या ‘चूकभूल’ प्रकरणाची चौकशी करण्याचेही स्वत:च जाहीर केले.
भंडाऱ्यात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार मारण्यात आल्याच्या घटनेवर शुक्रवारी राज्यसभेत चर्चा झाली. त्यानंतर गृहखात्यातर्फे निवेदन वाचून दाखवताना शिंदे यांनी या मुलींच्या नावांचा उल्लेख केला. त्यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी तातडीने आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार बलात्कार पीडितांची नावे जाहीर करता येत नाही, याकडे लक्ष वेधून जेटली यांनी शिंदे यांनी केलेली चूक निदर्शनास आणून दिली. शिंदे यांच्याकडून अजाणतेपणाने चूक झाल्याचे दिसत असून त्यांनी यासंबंधीचे नवे निवेदन सभागृहाच्या पटलावर ठेवावे, अशी मागणी जेटली यांनी केली. ही गफलत लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी जेटलींचे आभार मानत ही नावे वगळण्यात यावी, अशी विनंती केली. कुरियन यांनी तिन्ही मुलींची नावे कामकाजातून वगळण्याचे तसेच प्रसिद्धी माध्यमांनीही ही नावे प्रकाशित करू नये, असे निर्देश दिले.
निवेदनात पीडित मुलींची नावे कशी आली, याची चौकशी करण्याचे आदेश शिंदे यांनी गृह सचिव आर. के. सिंह यांना दिले आहेत. शिंदे यांची कोंडी करण्यासाठी गृह मंत्रालयातीलच काही अधिकारी सक्रिय झाले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. शिंदे यांनी राज्यसभेत करावयाचे निवेदन मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी तयार केले होते. त्यात ही नावे कशी टाकण्यात आली, याची चौकशी करण्यात येणार आहे.

शिंदेंची ‘जीभ घसरते’ तेव्हा..
*  सप्टेंबर २०१२ : बोफरेस भ्रष्टाचार प्रकरणाप्रमाणे कोळसा घोटाळाही जनतेच्या स्मृतीतून जाण्याचे विधान.
*  डिसेंबर २०१२ : दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर आंदोलन करणाऱ्यांची माओवाद्यांशी तुलना.  
*  डिसेंबर २०१२ : मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा संसदेत‘ श्रीयुत सईद’ असा उल्लेख.
*  जानेवारी २०१३ : संघ आणि भाजपवर हिंदूू दहशतवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर चालविल्याचे आरोप. महिन्याभरानंतर खेद व्यक्त.

बलात्कार प्रकरणी सीबीआय चौकशी नाही
भंडाऱ्यातील बलात्कार व हत्येच्या प्रकरणाची स्थानिक अधिकारी चौकशी करीत आहे. पोलिसांच्या तुकडय़ा स्थापन करण्यात आल्याचे शिंदे यांनी निवेदनात सांगितले. मात्र, अजूनही आरोपींना अटक झालेली नसल्याने सदस्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. भाजपचे सदस्य प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. पण त्याला नकार देतानाच तपासात वेग आणण्याच्या सूचना देण्यात येतील असे आश्वासन शिंदे यांनी दिले.