मोदी सरकारला एक धक्का बसला आहे. कारण शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडायची ठरवली तर आहेच. शिवाय शिरोमणी अकाली दल हे एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २२ वर्षांपासून हा पक्ष एनडीए सोबत होता. मोदी सरकारने नुकत्याच मंजुरी दिलेल्या कृषी विधेयकाला देशभरातून विरोध होतो आहे. विरोधकांनी या प्रश्नावरुन देशभरात आवाज उठवला आहे अशातच शिरोमणी अकाली दलाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

काय घडलं होतं?

कृषि क्षेत्राशी संबधित तीन विधेयकांना विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. ही विधेयके मांडण्याच्या आधी शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर हरसिमरत कौर बादल यांनीही ट्विट करून आपण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

मोदी सरकारबरोबर शिरोमणी अकाली दल केंद्रात सत्तेत  होतं. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.पंजाबच्या राजकारणात शेती आणि शेतकरी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्याचा परिणाम काँग्रेसला सत्ता मिळण्यात दिसून आला. काँग्रेसच्या घोषणेमुळे दहा वर्ष सत्तेत राहिलेल्या अकाली दलाला पायउतार व्हावं लागलं होतं. शेतकऱ्यांच्या मुद्यावरूनच पंजाबमध्ये सत्तांतर घडून आलं होतं. त्यात आता पंजाब विधानसभेची निवडणूक दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आधी मंत्रिमंडळातून शिरोमणी अकाली दल बाहेर पडलं आणि आता एनडीएतूनही बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.