शिवसेनेसह काँग्रेस, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स आक्रमक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, अपेक्षेप्रमाणे विरोधक आक्रमक झाले. शेतकरयांच्या प्रश्नावर शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत तसेच संसदेच्या आवारात प्रचंड घोषणाबाजी केली. शेतकरयांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सभात्याग केला.

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेचे सर्व खासदार पहिल्या रांगेत येऊन घोषणा देत होते.  सभागृह सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेच्या खासदारांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी करत निदर्शने केली. शून्य प्रहरानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, नवनियुक्त खासदार श्रीनिवास पाटील, एमआयएमचे इम्पियाज जलील आदी मराठी खासदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने दखल घेण्याची मागणी केली. दरम्यान, सातारा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी घटनेला स्मरून इंग्रजीतून शपथ घेतली.

फारूख अब्दुल्ला कुठे आहेत?

लोकसभेत शिवसेनेबरोबर काँग्रेस, द्रमूक आणि नॅशनल कॉन्फरन्स या तीनही विरोधी पक्षांचे सदस्य सभापतींच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणा देत होते. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते-खासदार फारुख अब्दुल्ला यांना लोकसभेत हजर राहता आले पाहिजे, ही मागणी लावून धरली. १०८ दिवस फारुख अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवले आहे.

विरोध पक्षांचे शिष्टमंडळ श्रीनगरला गेले होते. त्यांना विमानतळावरून परत पाठवले गेले. पण, परदेशातील खासदारांना मात्र काश्मीर खोऱ्यात फिरवले जाते, असा आक्षेप काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी घेतला. युरोपियन महासंघाच्या खासदारांचा उल्लेख चौधरी यांनी ‘भाड्याचे तट्ट’ असा केला. त्यावर सभापती ओम बिर्ला यांनी शब्दांचा प्रयोग सांभाळून करण्याची समज दिली.

फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद बेकायदा असून सभापतींनी पुढाकर घेऊन अब्दुल्ला यांना सभागृहात हजर राहता य़ेईल याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती द्रमूकचे नेते टी. बालू यांनी केली.

तृणूल काँग्रेसचे नेते सौगाता राय यांनी सभागृह सुरू होताच अब्दुल्ला इथे दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर, नव्या खासदारांना शपथ दिल्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळता येईल, असे बिर्ला म्हणाले.

अब्दुल्ला नजरकैदेत

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुच्छेद ३७० वरील चच्रेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, फारुख अब्दुल्ला यांना अटक केलेली नाही वा ते नजरकैदेत नाहीत असे सांगितले होते. याबाबत सभापती बिर्ला म्हणाले की, त्यावेळी शहा यांनी सभागृहाला दिलेली माहिती सत्यच होती. त्यावेळी अब्दुल्ला अटकेत वा नजरकैदेत नव्हते. मात्र, आता केंद्र सरकारकडून लोकसभेच्या सचिवालयाला लेखी माहिती देण्यात आली असून अब्दुल्ला हे नजरकैदेत आहेत.

सत्ताधारी बाकांवर शांतता

शिवसेना आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले असताना सत्ताधारी बाकांवर पूर्ण शांतता होती. आत्तापर्यंत सभागृहात सत्ताधारी भाजपचे खासदार विरोधी पक्षांना प्रत्युत्तर देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न करत असतात. पण, सोमवारी तसा कोणताही प्रयत्न भाजपच्या खासदारांकडून केला गेला नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत होते मात्र, लोकसभेत सकाळच्या सत्रात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सभागृहात अनुपस्थित होते.