“आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर राजकारणात करण्यात आला आहे,” असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शट अप या कुणाल या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात संजय राऊत सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.

“सेक्युलर या शब्दामुळे देशात हिंदू मुस्लीम अशी सरळ विभागणी झाली. तुम्ही केवळ हिंदूंना शिव्या दिल्यानं तुम्ही अधिक सेक्युलर असल्याचं म्हटलं जातं. हे चुकीचं आहे,” असं राऊत म्हणाले. “मुस्लीम या देशाचेच नागरिक आहेत. परंतु काही राजकीय पक्ष त्यांच्या मतांचं राजकारण करत असतात. त्यामुळे नुकसान हे देशाचंच होत असतं. त्यांचंही नुकसान होतं. कायम ते अंधारात राहावंस आणि त्यांनी आपल्या मागे यावं अशी त्या पक्षांची इच्छा असते. ज्या दिवशी मतांचं राजकारण थांबेल त्यादिवशी देश पुढे जाईल असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. केवळ एका निवडणुकीसाठी मुस्लीमांच्या मतदानाचा हक्क काढून घ्या असं ते म्हणाले होते. याचा अर्थ जे मतांचं राजकारण करतात ते यामुळे पळून जातील असा होता. आम्हाला काय म्हणायचं आहे याचा अर्थ समजून घ्या. मतांचं राजकारण या देशात चालू नये,” असं वाटत असल्याचंही ते म्हणाले.

हीच आमची विचारधारा

“आपला देश घटनेच्या आधारावरच चालणारा आहे. सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे. या देशात पहिल्यापासून जे राजकारण सुरू आहे त्यात केवळ मुस्लीम धर्माचाच आधार घेतला जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. मुस्लीमांनी कुराणवर हात ठेवून, हिंदूंनी भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घ्यायची, हे त्यावेळी बाळासाहेबांनी बंद करायला सांगितलं होतं. त्यावेळी बाळासाहेबांनी संविधानावर हात ठेवून शपथ घ्यायला लावा असं म्हटलं होतं. ही आमची विचारधारा आहे आणि तिच राहणार आहे,” असंही राऊत म्हणाले.