आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे राजधानी दिल्लीत लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. दिवसभरात विविध विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपोषणस्थळी भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राऊत यांनी नायडू यांची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असूनही दोन्ही पक्षांमध्ये अजूनही युतीबाबत बोलणी न झाल्याने संभ्रमावस्था असतानाच राऊत यांनी नायडू यांच्या व्यासपीठावर जाऊन यात आणखी भर पाडली आहे.

मोदींची वर्तणूक पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखी: केजरीवाल

तत्पूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन नायडू यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. मोदींची वर्तणूक ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखी असल्याची टीका त्यांनी केली होती. विरोधी पक्षाच्या मुख्यमत्र्यांना ते चांगली वागणूक देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आदींसह विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नायडू यांची भेट घेतली.