“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अयोध्येत भूमिपूजनाला असलेल्या राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुख महंतांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनानिमित्त लाल किल्ल्यावर कार्यक्रम आहे. आता पंतप्रधानांनाच प्रोटोकॉलनुसार क्वारंटाइन व्हावं लागतंय की काय असं वाटत आहे,” असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्ती केलं. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता. यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कोणत्याही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील करोनाच्या काळात गर्दी होऊन कळत-नकळत प्रसार होऊ द्यायचा नसेल तर ई-भूमिपूजन करता येऊ शकेल असा पर्याय सुचवला होता. यावर राऊत यांना अयोध्यावारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “राम मंदिरासाठी जाणं येणं ही बाब निराळी आहे. ही ती वेळ आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्या ठिकाणी असलेले प्रमुख मंहत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली. त्या ठिकाणी असलेल्या काही अन्य लोकांनाही करोनाची लागण झाली. आता १५ ऑगस्ट आपला स्वातंत्रदिन आहे. लालकिल्ल्यावरून कार्यक्रमही पार पडणार आहे. पण त्यापूर्वी पंतप्रधानांनाच प्रोटोकॉलनुसार क्वारंटाइन व्हावं लागतंय की काय? असं वाटत आहे,” असं उत्तर राऊत यांनी दिलं.

करोनामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कोणत्याही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी येण्याचं आमंत्रण दिलं नव्हतं. परंतु आम्ही नंतर त्या ठिकाणी जाऊ आणि धुमधडाक्यात जाऊ, असंही ते म्हणाले.

नृत्यगोपालदास यांना करोना

अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला होता. महत्त्वाचं म्हणजे ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते.