विधानसभेच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता भाजपकडून शिवसेनेला केंद्रीय मंत्रिपदाचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात अवघ्या एका मंत्रिपदावर बोळवण झाल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेच्या आणखी काही मंत्र्यांना केंद्रात समाविष्ट करण्याचे संकेत गुरूवारी भाजपकडून देण्यात आले. भाजपप्रणित एनडीएने केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेच्या अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योगमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. केंद्रात अपुरे प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे असलेली शिवसेनेची नाराजी येत्या मंत्रिमंडळ विस्तारात दूर करण्याचा नरेंद्र मोदींचा विचार असल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्रातील विधानसभा जागावाटपात सेनेने नमती भूमिका घ्यावी यासाठी, भाजपकडून सेनेला केंद्रीय मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्रिपदाच्या मोबदल्यात १५० ऐवजी १४४ जागांचे सूत्र शिवसेनेच्या गळी उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून यासंबंधीचा प्रस्ताव शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे ठेवण्यात आला असून त्यांनी प्रस्तावावर विचार करून जागावापाचा रखडलेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी भाजपची अपेक्षा आहे.
मात्र, शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने यासंदर्भात बोलताना, येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे याबद्दलचा निर्णय घेतील असे सांगितले. शिवसेनेने याअगोदरच १६९ जागांवरून १५० जागांचा प्रस्ताव मान्य करून आपल्या कोट्यातील १९ जागा भाजपसाठी सोडल्या आहेत. तेव्हा आता भाजपला शिवसेनेकडून अजून किती समजुतदारपणाची अपेक्षा आहे, असा सवालदेखील या नेत्याने उपस्थित केला.