भारताला काँग्रेसमुक्त करण्याआधी दुष्काळमुक्त करावे, असा टोला शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. देश दुष्काळमुक्त झाला की आपोआपच काँग्रेसमुक्त होईल. राजकारणात निवडणुकीच्यावेळी अनेक घोषणा केल्या जातात. त्याप्रमाणे आम्हीही काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली, त्यात काही वावगेही नाही. मात्र, सध्याच्या घडीला देशाला काँग्रेसमुक्त करण्यापेक्षा दुष्काळमुक्त करण्यावर भर देणे गरजेचे आहे. हा दुष्काळ म्हणजे काँग्रेसच्या गेल्या ५० वर्षांतील सत्तेचा परिणाम आहे. दोन दिवसांत यावर तोडगा काढता येणार नसला तरी दुष्काळ हटवणे ही आपली जबाबदारी आहे. देशातील अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असून लोक स्थलांतर करत आहेत. हे आपल्या भारतमातेचे सुपूत्र आहेत, त्यांना ‘भारतमाता की जय’ बोलावेसे वाटते. मात्र, भुकेल्या आणि तहानलेल्या लोकांकडून तुम्ही ‘भारत माता की जय’ म्हणण्याची अपेक्षा कशी करू शकणार, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाडय़ात किमान एक दिवस तरी राहून दाखवावे, असे आव्हान दिले.