माझ्या वर्तनाने जर संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असेल तर मी माफी मागतो. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या माझ्या आईसारख्याच आहेत. बाहेर माझ्याविरोधात मीडिया ट्रायल सुरु आहे. पण आता या संसदेत मला न्याय मिळेल अशी आशा शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. एअर इंडियाच्याच कर्मचाऱ्याने माझ्याविरोधात दुर्व्यवहार केला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड गुरुवारी दिल्लीत दाखल झाले. खासगी विमानाने दाखल झालेले गायकवाड संसदेत काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. भाषणाच्या सुरुवातीलाच गायकवाडांनी संसदेतील सर्व सदस्यांचे आभार मानले. एअर लाईन्सने माझ्यावर आणि संसदेच्या सर्व सदस्यांना गुन्हेगार कसे ठरवले हे सर्व सांगण्यासाठी मी इथे आलो आहे असे त्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा मी आदर करतो. तुम्ही माझ्या आईसारख्या आहेत. आता तुमच्याकडून मला न्याय मिळेल अशी आशा आहे. माझा अपराध काय, मी काय गुन्हा की त्याचा तपास न करताच माझ्याविरोधात मीडिया ट्रायल सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. २३ मार्चला नेमके काय घडले याची माहितीही त्यांनी संसदेत दिली. एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीत अधिवेशनासाठी येण्यासाठी निघालो होतो. माझे बिझनेस क्लासचे तिकिट होते. पण मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवले होते. मी जागेसाठी भांडलो आणि मारहाण केल्याचा एअर इंडियाचा दावा चुकीचा आहे. दिल्लीत आल्यावर उतरताना मी शांतपणे क्रू मेम्बर्सना तक्रार वही मागितली होती.  ४५ मिनिटांनी एक अधिकारी तिथे आले. तो मलाच जाब विचारत होता. मी त्यांना विचारले की तुम्ही कोणा आहात ?. त्यावर त्या अधिकाऱ्याने मी एअर इंडियाचा बाप आहे असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. मग त्याने माझी कॉलर पकडून ढकलण्याचा प्रयत्न केला. या दुर्व्यवहार आणि अपमानामुळे मला राग आला आणि मी त्याला ढकलले असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मी शिक्षक असून विनम्रता माझा स्वभाव आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानुसार मी संसदेची माफी मागतो. माझ्या वर्तनाने संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असेल तर मी माफी मागतो. पण एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांची माफी मागणार नाही असे त्यांनी खडसावून सांगितले. माझ्याविरोधात दिल्ली पोलिसांनी हत्येचा प्रयत्न  केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. माझ्याकडे कोणते हत्यार होते? मग माझ्यावर एवढा गंभीर स्वरुपाचा गुन्हा कसा दाखल झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासंपूर्ण घटनेचा तपास करुन दोषींवर कारवाई करावी. तसेच हवाई प्रवासबंदी मागे घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. गायकवाड यांच्या भाषणापूर्वी शिवसेना खासदारांनी लोकसभेत एअर इंडियाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एअर इंडिया मुर्दाबाद अशी घोषणा देत शिवसेनेच्या खासदारांनी सभागृह दणाणून सोडला.