एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड दिवसेंदिवस अधिकच चर्चेत येत चालले आहेत. त्यामुळे सध्या रवींद्र गायकवाड यांच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी प्रसारमाध्यमांतून ऐकायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र गायकवाड यांचा ‘ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस’चा रेल्वे प्रवास चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता रवींद्र गायकवाड यांच्याबद्दलचा आणखी एक भन्नाट किस्सा समोर आला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून दिल्लीत आल्यानंतर प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना गायकवाड आपली बाजू आक्रमकपणे मांडताना दिसत होते. त्यांना स्वत:च्या कृत्याचा किंचितही पश्चाताप नव्हता. गायकवाड यांनी त्याच रात्री दिल्लीत ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’ हा चित्रपटही पाहिला होता, अशी माहिती समजते आहे.

या सगळ्या प्रकारानंतर विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकले होते. मात्र तरीही ‘माझ्याकडे तिकीट असल्याने ते मला काळ्या यादीत टाकू शकत नाहीत. मी संध्याकाळी दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानातून प्रवास करणार आहे. एअर इंडियाने माझ्याविरोधात कारवाई करुन दाखवावीच’ असे थेट आव्हानच खासदार गायकवाड यांनी दिले होते. मात्र, त्यानंतर टीकेची वाढती झोड पाहता गायकवाड काहीसे मवाळ झाले होते. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवासादरम्यान प्रसारमाध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी गायकवाड वापी स्थानकावरून अचानकपणे गाडीतून गायब झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या खासगी वाहनाने उस्मानाबाद गाठले होते. दरम्यान, या सगळ्यावर शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. पक्षाकडून गायकवाड यांना समज देण्यात आली असली तरी त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सार्वजनिक जीवनात भान ठेवून वागावे लागते इतक्या माफक शब्दांमध्ये त्यांना समज देण्यात आली आहे. तसेच गायकवाड यांचे ते वर्तन वैयक्तिक होते, असे सांगून सेनेने हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सध्या शिवसेनेकडून त्यांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचे आदेश दिले आहेत.