उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला पराभवाचे संकेत मिळत आहेत. हीच संधी साधत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. हे निकाल योगी सरकारला धक्कादायक आहेत. यापासून भाजपाने धडा घ्यावा, असा सल्ला देत भाजपाने उंच उडी घेणे बंद केले पाहिजे, अशा शब्दांत टोला लगावला. समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाच्या युतीने हे काम केलंय हे मी मानणार नाही. प्रभू श्रीरामांची सर्वांत जास्त निंदा करणाऱ्या नेत्याला तुम्ही ज्या दिवशी रेड कार्पेट टाकले. त्याच दिवशी प्रभू श्रीराम तुमच्याविरोधात गेले, असे मला वाटते, अशा खोचक शब्दांत त्यांनी भाजपाचा समाचार घेतला.

दोनच दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे नरेश अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सपच्या जया बच्चन यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यामुळे एका महिलेविषयी अभद्र टिप्पणी करणाऱ्याला भाजपात प्रवेश दिल्यामुळे भाजपातील प्रमुख महिला नेत्यांनीही नाराजी दर्शवली होती. तसेच यापूर्वी विरोधात असताना अग्रवाल यांनी भाजपा आणि प्रभू श्रीरामांविषयी अनेकवेळा चिथावणीखोर वक्तव्ये केले होते. त्यांनाच भाजपाने सन्मानाने पक्षात घेतल्यामुळेच भाजपाची ही अवस्था झाल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले.

या निवडणुकीत भलेही सपच्या उमेदवाराचा विजय झाला असेल. पण यामुळे काँग्रेसलाही खूप उत्साह आल्याचे दिसते. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, सामान्य जनतेने किसान विरोधी, युवा विरोधी आणि महिला विरोधी निती असलेल्या सरकारविरोधात जनमत दिले आहे. या निकालांमुळे हे स्पष्ट झाले आहे की, जनता भाजपाला बाहेरचा रस्ता दाखवत आहे. फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच विजय निश्चित मानला जात होता. अशात या पराभवामुळे सर्वच विरोधी पक्ष उत्साहित झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रातही भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संबंध मधूर राहिलेले नाहीत. अशात गोरखपूर आणि फुलपूरसारख्या महत्वाच्या मतदारसंघातील पराभवामुळे भाजपावर दबाव वाढवण्याची सेनेला संधी चालून आली आहे.