नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात आलं. गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावर राज्यसभेत निवेदन दिलं. धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना या विधेयकामुळे न्याय मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सहा तासांचा कालावधी देण्यात आला होता. यावेळी शिवसेनेनं राज्यसभेत आपली भूमिका मांडली. तुम्ही ज्या शाळेत शिकलात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत, असं म्हणतं शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसंच मानवतेच्या दृष्टीकोनातून या विधेयकावर चर्चा झाली पाहिजे. यावर व्होटबँकेचं राजकारण करू नये, असंही ते यावेळी म्हणाले.

पाकिस्तानची भाषा आम्हाला मान्य नाही. ही काही पाकिस्तानची संसद नाही, असं राऊत यावेळी म्हणाले. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. परंतु या विधेयकाला देशाच्या अनेक भागांमधून विरोध होत आहे. या विधेयकाच्या विरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनंही झाली. आम्ही किती कठोर हिंदुत्ववादी आहोत याचं आम्हाला कोणाकडूनही प्रमाणपत्र नको. तुम्ही ज्या शाळेत शिकलात, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे आमचे हेडमास्तर आहेत, असं विधान त्यांनी यावेळी केलं.

हे विधेयक धार्मिक नाही. पण या विधेयकावर मानवतेच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली पाहिजे. शरणार्थी आणि घुरखोरांमध्ये काही फरक आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील आमच्या बांधवांच्या अधिकारांचं हनन होत आहे. पाकिस्तानची भाषा आम्हाला मंजूर नाही. पाकिस्तानामध्ये जबरदस्ती धर्मांतरण करण्यात येतंय असं म्हणत देशातल्या घुसखोरांना बाहेर काढणार का? असा सवालही राऊत यांनी यावेळी केला.