“राज्याला केंद्र सरकारकडून सहकार्य मिळालं नाही असं आम्ही कधीही म्हटलं नाही. श्रमिक मजुरांना रेल्वेनं त्यांच्या मूळ गावी पाठवण्यावरून काही वाद होते. त्याव्यतिरिक्त अन्य काही वाद नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा सुरू असते. तसंच मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शनही मिळत असतं,” असं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“सध्या विद्यमान सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू आहे आणि त्यांना एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांच्या एका वर्षांच्या कामावर टीका करणं योग्य नाही. गेल्या वर्षभरात काही चांगली कामंही झाली. गेले काही महिने आता करोनाचं संकटही आपल्यावर आलं आहे. परंतु सरकारच्या मागील कार्याकाळापासून सुरू असलेलं अर्थव्यवस्थेवरील संकट आताही कायम आहे. या सराकरनं अनेक चांगली कामंदेखील केली आहेत. तिहेरी तलाक, कलम ३७० हटवणं, राममंदिराची उभारणी अशी अनेक कामं सरकारनं केली आहेत,” असं ते म्हणाले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आणखी वाचा- वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात- संजय राऊत

आम्ही चमचेगीरी केली नाही

“आम्ही सरकारसोबत नव्हतो तेव्हाही आम्ही कलम ३७० हटवण्यावरून त्यांनी साहसी निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. आम्ही चमचेगीरीची गोष्ट कधीही केली नाही. जे चांगलं आहे ते आम्ही मान्य केलं,” असंही ते म्हणाले.

टाळी एका हातानं वाजत नाही

“भाजपासोबत दुरावा निर्माण होण्याचे कारण आम्ही नाही. आम्ही गेल्या ३० वर्षांपासून एकत्र होतो. राजकारणात टाळी एका हाताने वाजत नाही, असं राऊत म्हणाले. सध्या सरकार उत्तम आणि शांतीपूर्ण मार्गानं चाललं आहे. निर्णय प्रक्रियेवरून महाराष्ट्रात कोणताही विसंवाद नाही. निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे,” असंही राऊत म्हणाले.

आणखी वाचा- करोना संकटकाळात मोदी पंतप्रधान हे भारताचे सुदैव – राजनाथ सिंह

मुंबईची स्थिती नियंत्रणात

“मुंबईची स्थिती आता नियंत्रणात आली आहे. शुक्रवारी एका दिवसात ८ हजार ५०० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सोबत राहायला हवं. कोणीही राजकारण करू नये. पुढील सहा महिने आपल्याला राजकारण करायचं नाही. हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “विरोधीपक्षाचे नेते शॅडो कॅबिनेट चालवतात. ते सरकारवर अंकुश ठेवतात. आमचं काही चुकलं तर फडणवीसांनी तसं करायला हवं. आम्हाला सरकार चालवण्यात कोणतीही अडचण नाही,” राऊत म्हणाले.