आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जात नसल्यामुळे टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसकडून लोकसभेत आज (दि.१९) अविश्वास प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष यासाठी इतर पक्षांकडून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मोदी सरकारवर नाराज असलेल्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष आहे. पण याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निर्णय घेतील. थोडं थांबा आणि प्रतिक्षा करा, असा पवित्रा शिवसेनेने घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘एएनआय’शी बोलताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेने आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे जाहीर केल्यापासून ते एनडीएतून बाहेर कधी पडणार याचीच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यांच्याकडून वारंवार मोदी सरकार आणि भाजपावर टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर शिवसेना अविश्वास ठरावावेळी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर राऊत म्हणाले की, थांबा आणि प्रतिक्षा करा. लोकसभा अध्यक्षा अविश्वास ठराव दाखल करून घेतात किंवा नाही हे पाहूयात. टीडीपीला त्यांच्या राज्याशी संबंधित काही समस्या आहेत आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. सध्या तरी आम्ही अविश्वास ठरावाबाबत काहीच ठरवलेले नाही. उद्धवजीच याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांचे ‘मौन’, चंद्राबाबूंचा संघर्ष सुरू; अविश्वास ठरावावरून सेनेचे मोदींवर टीकास्त्र

दरम्यान, आजच्या सामना या आपल्या मुखपत्रातून सेनेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. सरकारवर लोकांचा अविश्वास व असंतोष खदखदत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत याचा स्फोट होईल. आता सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे हा अविश्वास ठराव आता नव्हे तर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मंजूर होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. जनतेने आपल्या बाजूने मतदान करावे म्हणून मोदी हे आश्वासन देतात. पण प्रत्यक्षात काहीच करत नसल्याचा आरोप करत बिहारचे उदाहरणही दिले. आंध्रच्या बाबतीत नेमके काय घडले ते मोदी आणि चंद्राबाबूच सांगू शकतील. पंतप्रधानांचे मौन सुरू आहे व चंद्राबाबू संघर्ष करत आहेत असे म्हणत तेलुगू बांधवांना त्यांनी उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.