संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ-एनडीए) बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे ‘रालोआ’तून बाहेर पडणे निश्चित मानले जाते.
संसदेच्या अधिवेशनाआधी ‘रालोआ’ची बैठक बोलावली जाते. या बैठकीसाठी प्रत्येक वेळी शिवसेनेला निमंत्रण दिले जात असे. या वेळी मात्र शिवसेनेला अजून तरी निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेचे नेते बैठकीला जाणार नाहीत, असे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. ‘रालोआ’तील घटकपक्षांच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने रविवारी परंपरेप्रमाणे सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली असून त्या बैठकीला मात्र शिवसेना उपस्थित असेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि अकाली दल दे दोन्ही पक्ष ‘रालोआ’चे निव्वळ घटकपक्षच नव्हे तर, आघाडीतील संस्थापक पक्ष आहेत. पण, आता शिवसेनेचे ‘रालोआ’तून बाहेर पडणे ही केवळ औपचारिकता उरली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर असे चार आठवडे चालणार आहे.
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार स्थापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय, केंद्रात मिळालेले एकमेव मंत्री पदही शिवसेनेने सोडले आहे. अरविंद सावंत यांनी अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने ‘रालोआ’शी काडीमोड घेतल्याचे स्पष्ट झाले होते. रविवारी ‘रालोआ’च्या बैठकीला शिवसेनानेते अनुपस्थित राहिले तर शिवसेनेच्या ‘रालोआ’तून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब होईल.
..तर सेना खासदार विरोधी बाकावर
हिवाळी अधिवेशनात शिवसेना अधिकृतपणे विरोधी पक्षांच्या बाकावर बसण्याची शक्यता आहे. राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांची आसन व्यवस्था सत्ताधारी ‘रालोआ’सह न करता विरोधी पक्षांच्या बाजूला करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसभेत संजय राऊत, अनिल देसाई हे सेना खासदार वेगळ्या बाकांवर बसलेले दिसतील. राज्यसभेत वा लोकसभेत शिवसेनेच्या सदस्यांची आसन व्यवस्था बदलण्यात येणार असल्याचे कानावर आले आहे. तसे झाले तर शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसतील, असे विनायक राऊत म्हणाले.
‘रालोआ’च्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच नाही, आम्हाला या बैठकीचे निमंत्रणच देण्यात आलेले नाही. आम्ही अजूनही ‘रालोआ’चे घटक आहोत, मात्र आता भाजपनेच काय ते ठरवावे. आम्ही ‘रालोआ’मध्ये नाही, असे निवेदन आमच्या पक्षप्रमुखांनी काढलेले नाही.
– विनायक राऊत, शिवसेना गटनेते
First Published on November 17, 2019 1:44 am