प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी फेरनिवड करण्यात यावी, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढील आठवड्यात प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. प्रणव मुखर्जी हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. मात्र प्रणव मुखर्जी यांना पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदी संधी देण्यात यावी, असे राऊत यांनी म्हटले आहे. ‘प्रणव मुखर्जी हे भारताला लाभलेले सर्वोत्तम राष्ट्रपती आहेत. त्यांच्या क्षमतेवर कोणालाही शंका नाही,’ अशा शब्दांमध्ये राऊत यांनी मुखर्जींचे कौतुक केले आहे.
‘प्रणव मुखर्जी गेल्या ५ वर्षांमध्ये कोणत्याही वादात अडकलेले नाहीत. त्यांना देशातील आणि जगातील परिस्थितीची उत्तम जाण आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदी बसण्याची संधी दिली जावी’, असे राऊत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ‘हाय कमांड यासंबंधी निर्णय घेतील,’ अशी माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी दिली आहे.
‘सर्व पक्षप्रमुखांशी चर्चा करुन याबद्दल निर्णय व्हायला हवा. याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रणव मुखर्जी यांच्याविषयी प्रचंड आदर आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
‘शिवसेनेने सर्जिकल स्ट्राइकबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन होते. त्याचप्रकारे शिवसेना राष्ट्रपतींच्या चांगल्या कामाचे कौतुक करत आहे,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.