सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली याचिकांवर सुनावणी झाली. ४० दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर बुधवारी याबाबत सुनावणी पूर्ण झाली. आता लवकर याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना राम मंदिराला मुस्लीमांचा नाही तर निधर्मी राजकीय बेगड्यांचा विरोध असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. एका आक्रमकाने हिंदूंच्या श्रद्धास्थानावर अतिक्रमण केले. ते हटवण्याचा हा संघर्ष आहे. त्यात रामरायांचा विजय होईल, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

येत्या १७ नोव्हेंबर रोजी राम मंदिराबाबत निकाल लागेल. तसंच हा दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्याचा आहे. तीस वर्षांपूर्वी सगळ्यांनीच झिडकारलेल्या प्रभू रामाच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. १७ नोव्हेंबरला रामभक्त शिवसेनाप्रमुखांच्या समाधीस्थळावर फुले उधळतील, असं शिवसेनंनं आपल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. रामजन्मभूमी कोणाची हा निकाल सर्वोच्च न्यायालय देईल. परंतु रामजन्मभूमीचा वाद हा निरर्थक आणि हास्यास्पद असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. बाबर हा अफगाणिस्तानातून आला असून त्यानं मंदिरं तोडून मशिदी बांधल्या. हेच अयोध्येतही घडलं असून रामजन्मभूमीवर एक मशिद उभी राहिली. बाबराच्या मशिदीत ज्या मुसलमानांच्या भावना गुंतल्या आहेत त्यांना आम्ही ‘भारतवासी’ कसे मानणार? प्रश्न फक्त मुसलमानांचाच नाही, तर बाबराच्या बेकायदेशीर मशिदीसाठी मातम करणारे अनेक राजकीय बेगडी निधर्मी आहेत. मुसलमानांपेक्षा या बेगड्यांनीच राममंदिरास विरोध केला, असं म्हणत प्रभू श्रीराम अयोध्येत जन्मास आले नाही तर कोठे जन्मले? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?
अयोध्येतील राममंदिरासाठी ज्यांनी शरयूच्या पात्रात समाधी घेतली अशा असंख्य रामभक्तांचे, करसेवकांचे प्राण त्याच शरयूच्या लाटांवरून राममंदिर निर्माण झालेले पाहणार आहेत. एका आक्रमकाने हिंदूंच्या श्रद्धास्थानावर अतिक्रमण केले. ते हटवण्याचा हा संघर्ष आहे. त्यात रामरायांचा विजय होईल. १७ नोव्हेंबरला हा ऐतिहासिक निर्णय लागेल. हा दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्याचा आहे. तीस वर्षांपूर्वी सगळ्यांनीच झिडकारलेल्या प्रभू रामाच्या पाठीशी हिंदुहृदयसम्राट उभे राहिले. १७ नोव्हेंबरला रामभक्त शिवसेनाप्रमुखांच्या समाधीस्थळावर फुले उधळतील!

बाबरी खटल्यात शिवसेनाप्रमुखांवर खटलाही चालला. हा इतिहास जुना नाही. या सर्व प्रकरणास न्यायालयात गती मिळाली ती मोदी यांच्या राजवटीत. अयोध्येसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले गेले व सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सलग चाळीस दिवस ऐकला. आता १७ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. या वेळी अयोध्येत भव्य दीपोत्सव साजरा करू, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे व ते रामजन्मभूमीवरच व्हावे अशी जगभरातील हिंदूंची इच्छा आहे. त्यासाठी संघर्ष झाला, त्यापेक्षा जास्त राजकारण झाले. याप्रश्नी सरकारे निर्माण झाली आणि गेली. गेल्या तीस वर्षांत अयोध्येतील शरयूतून बरेच पाणी वाहून गेले, पण राममंदिरासाठी ज्यांनी शरयूच्या पात्रात समाधी घेतली अशा असंख्य रामभक्तांचे, करसेवकांचे प्राण त्याच शरयूच्या लाटांवरून राममंदिर निर्माण झालेले पाहणार आहेत. हिंदू आणि मुस्लिमांतला हा वाद निरर्थक आहे. ही दोन संस्कृतींमधली लढाई आहे. एका आक्रमकाने हिंदूंच्या श्रद्धास्थानावर अतिक्रमण केले. ते हटवण्याचा हा संघर्ष आहे. त्यात रामरायांचा विजय होईल.