माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना मोठ्या नाट्यानंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. यानंतर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शाह, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

चिदंबरम हे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. परंचु ते कायद्याच्या वर नाहीत, असे अग्रलेखातून म्हटलं आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त 4.62 कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक 305 कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय? ते चिदंबरम आणि कार्ती यांनाच माहित असल्याचे यात नमूद करण्यात आलं आहे. चिदंबरम हे गृहमंत्री असताना सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून अमित शाह, नरेंद्र मोदी, प्रज्ञासिंह ठाकूर हे त्यांचे बळी ठरले होते. तसेच चिंदबरम हे ज्येष्ठ वकील आहे. ज्याक्षणी चिदंबरम यांचा जामीन न्यायालयाने रद्द केला व सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जावर तातडीच्या सुनावणीस नकार दिला, त्या वेळीच चिदंबरम यांनी स्वतःहून सीबीआय मुख्यालयात हजर व्हायला हवे होते, असेही यात नमूद करण्यात आलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

पी. चिदंबरम यांना अखेर अटक झाली आहे. त्यांच्या अटकेच्या निमित्ताने दिल्लीत जे नाटय़ ‘सीबीआय’ने घडवले त्याची खरेच आवश्यकता होती का? एका आर्थिक घोटाळ्यात चिदंबरम यांना अंतरिम जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने नाकारला. सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आवारातून चिदंबरम अदृश्य झाले ते 72 तासांनंतर काँग्रेस मुख्यालयात प्रकट झाले. आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. चिदंबरम तेथून स्वतःच्या घरी पोहोचले व सीबीआयने त्यांच्या अटकेसाठी जे नाटय़ केले ते संपूर्ण देशाने पाहिले. चिदंबरम हे 72 तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही. ज्या तपासयंत्रणा चिदंबरमसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला शोधू शकल्या नाहीत त्या यंत्रणा गुन्हेगार पिंवा अतिरेक्यांचा कसा शोध घेणार, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 72 तासांत चिदंबरम कोठे होते, हे पोलीस पिंवा इतर तपासयंत्रणा शोधू शकत नसतील तर ते त्यांचे अपयश म्हणावे लागेल. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत. चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध? ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत.

आयएनएस व्यवहार दांडीयात्र नव्हे

काँग्रेस मुख्यालयात प्रकट झालेल्या चिदंबरम यांनी सांगितले, ‘आयएनएक्स घोटाळ्यात मी आरोपी नाही.’ चिदंबरम यांचे हे म्हणणे असेल तर गेले सहा महिने ते ‘जामीन’ घेऊन का वावरत होते व आरोपी नसताना अटक करून न्यायला तपासयंत्रणांना वेड लागले आहे काय? ‘‘स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशा वेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन,’’ असे वक्तव्य चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात केले. चिदंबरम हे कोणत्या स्वातंत्र्याची भाषा करीत आहेत? ‘आयएनएक्स’ व ‘एअरसेल’ व्यवहार म्हणजे ‘मिठाचा सत्याग्रह’ किंवा ‘गांधींची दांडीयात्रा’ नव्हे. हा काही स्वातंत्र्यसंग्राम नाही. त्यामुळे या प्रकरणास नैतिकता व लोकशाही मूल्यांचा मुलामा देण्याची गरज नाही. चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विपृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठापूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे. चिदंबरम मात्र त्याच ‘सी.बी.आय.’च्या कोठडीत पोहोचले. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत. राजशकट कसे चालते व हलते याचा अनुभव त्यांना आहे. आहे त्या परिस्थितीस सामोरे जाणे व स्वतःचा बचाव करीत राहणे हाच उपाय आहे. काँग्रेसचा क्षीण झालेला आवाज काही दिवसांत मूक होईल. लोक चिदंबरम यांना विसरून जातील.