शिवसेनेने भाजपासोबतच रहावे ही आमची इच्छा आहेच असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. मुंबईत भाजपाचा महामेळावा पार पडला. त्यानंतर अमित शाह यांना शिवसेनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे. भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात आहे. मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांना कायम पाण्यात पाहात असतात हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. अशात शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा जर वेगळे लढले तर त्याचा तोटा दोन्ही पक्षांना होऊ शकतो. असे घडू नये म्हणूनच शिवसेनेच्या वाघाला गोंजारण्यास भाजपाने सुरुवात केली आहे हेच अमित शाह यांचे वक्तव्य सांगते आहे.

१९९५ पासून दोन्ही पक्षांची युती आहे. मात्र २०१४ मध्ये जेव्हा भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तेव्हा या दोन्ही पक्षांमधील दुही समोर येण्यास सुरुवात झाली. सत्ता स्थापनेसाठी हे दोन पक्ष एकत्र आले खरे पण तुझे-माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशीच या पक्षांची स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीला विरोधकांना संपवण्यासाठी शिवसेना जाणीवपूर्वक हे धोरण अवलंबते आहे असाही कयास काही राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केला. मात्र गेल्या चार-साडेचार वर्षांचा संसार पाहिला तर धनुष्यबाण आणि कमळबाई यांचे फारसे जमले नसल्याचेच दिसून आले आहे. आता निवडणुकांचे घोडा मैदान जवळ आले आहे. या परिस्थितीत जर एकट्याने लढले तर दोन्ही पक्षांना त्याचा फटका बसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे अमित शाह यांनी आज झालेल्या महामेळाव्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यात शिवसेनेला बाबत राजकीय आस्था दाखवत सेनेने भाजपासोबतच राहावे अशी इच्छा अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

एरवी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे हे दोन पक्ष आता काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया देणार का? २०१९ साठी शिवसेना आणि भाजपा एकत्रच लढणार का? भाजपा मोठ्या आणि शिवसेना लहान भावाच्या भूमिकेतच राहणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.