राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत १५० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने स्वबळावर बिहार निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्ष महाराष्ट्रात भाजपसह सत्तेत आहे. मात्र बिहारमध्ये १५० जागा लढविणार आहोत. या निवडणुकीत भाजपसमोर जनता दल- राष्ट्रीय जनता दल- कॉंग्रेस या युतीचे कडवे आव्हान आहे.
शिवसेना बिहारी जनतेच्या विरोधी पक्ष असल्याच्या आरोपाचे राऊत यांनी खंडन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेला देशातील सर्व राज्यांतील जनतेच्या भावनांचा आदर वाटतो. त्यामुळे बिहारविरोधी असल्याचा आरोप खोटा आणि जनतेची फसवणूक करणारा आहे.
राऊत म्हणाले की, बिहारमधील काही राजकीय नेते मुंबईमधील बिहारी जनतेच्या विरोधातील घटनांवरून राजकारण करत आहेत.
शिवसेना हिंदुत्व, गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मिती या मुद्दय़ांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या (२१ सप्टेंबर) रोजी जाहीर करण्यात येणार आहे. भाजपशिवाय निवडणूक लढवीत असल्याबाबत विचारल्यावर राऊत म्हणाले की, उत्तर भारतात शिवसेनेचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी १२ ऑक्टोबरपासून पाच टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे.