केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाला आठवडाही उलटत नाही तोच त्यांच्या मंत्रालयावर दावा सांगण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. जूनअखेरीस होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला ग्रामीण विकास मंत्रालय देण्याची मागणी शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे समजते. सध्या शिवसेनेकडे अवजड उद्योग हे एकच मंत्रालय असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच शिवसेना नेते भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे ग्रामीण विकास मंत्रालय देऊन ही नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदी व भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यात लवकरच चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंडे यांचे गेल्या मंगळवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सध्या केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे. मात्र, आता राज्यात भाजपचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मुंडे यांचे हेच मंत्रालय हवे असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपप्रणीत रालोआमध्ये शिवसेनेचे संख्याबळ इतरांपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत मात्र शिवसेनेच्या वाटय़ाला एकच मंत्रिपद आले. त्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. मुंडे यांच्या निधनामुळे हेच मंत्रालय आपल्याला मिळावे, अशी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे. मात्र, याबाबत अद्याप पक्षांतर्गत चर्चा सुरू असून भाजप नेत्यांशी कोणतीही बोलणी सुरू नसल्याचे शिवसेनेच्या गोटातून स्पष्ट करण्यात आले. भाजपनेही शिवसेनेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. मुंडे यांच्या निधनामुळे केवळ भाजपच नव्हे तर शिवसेनेलाही धक्का बसला आहे. राज्यात महायुतीला अनुकूल वातावरण असले तरी विरोधकांना कमी लेखता येणार नाही, असेही शिवसेना नेते स्पष्टपणे सांगतात. मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट तर तीन राज्यमंत्रिपदे हवी होती. प्रत्यक्षात मोदींनी त्यांना एकच मंत्रिपद दिले. उर्वरित अनुशेष विस्तारात भरू, असे आश्वासन देऊन मोदींनी शिवसेनेची बोळवण केली होती. आता मात्र शिवसेना आक्रमक झाली आहे. मोदीलाटेपेक्षा बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यावर सेनेचे खासदार निवडून आल्याचा दावा सेना नेते सातत्याने करीत आहेत. आता ग्रामीण विकास मंत्रालयावर शिवसेनेने दावा केला आहे. अर्थात, या वादाचा कोणताही परिणाम युतीवर होणार नाही, अशी ग्वाही सूत्रांनी दिली.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून शिवसेनेला ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे घट्ट करता येतील. ग्रामीण भागात अनेक योजना राबविण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय हेच एक प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे हे मंत्रालय आमच्या वाटय़ाला यावे अशी इच्छा आहे, शिवाय सामान्य जनतेशी नाळ असलेले हे मंत्रालय आहे.
    – शिवसेनेतील सूत्र