रालोआचे घटक पक्ष, संघ परिवारातील संघटना व काँग्रेससह एकवटलेल्या विरोधी पक्षांच्या आक्रमणामुळे एक पाऊल मागे जात केंद्र सरकारने सादर केलेले नव-सुधारित जमीन अधिग्रहण विधेयक अखेर मंगळवारी आवाजी मतदानात लोकसभेत मंजूर करण्यात आले. शेतकरी हितासाठी या विधेयकाला जोरदार विरोध करू, अशा घोषणा करून शिवसेनेने ऐन वेळी घूमजाव करून तटस्थ भूमिका घेतली. तर विधेयकाच्या बाजून मतदान करून अण्णा द्रमुकने नव्या समीकरणांचे संकेत दिले. विधेयकात अखेरच्या दिवशी सरकारने तब्बल नऊ सुधारणा केल्या. सलग पाच तासांच्या चर्चेनंतर मतदानास प्रारंभ झाला. मतदानाच्या वेळी काँग्रेस, बीजू जनता दल, समाजवादी पक्ष, राजद, तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनी सभात्याग करीत विरोध नोंदवला.
जमीन अधिग्रहण विधेयकास प्रारंभापासून विरोध करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी आजही सरकारवर हल्लाबोल केला. आतापर्यंत सरकारने जमीन अधिग्रहित केलेल्या प्रकल्पांची ‘श्वेत पत्रिका’ काढण्याची मागणी त्यांनी केली. जमीन घेतली जाते; पण विकासकामे होण्याऐवजी अन्य कुणाचे तरी हित होते, असा आरोप शेट्टी यांनी केला. भाषणात मोदी वा अन्य कुणाही नेत्याचे नाव न घेता शेट्टी यांनी भाजप नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांनी, मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. तुमच्या हेतूविषयी शंका नाही; पण जो मार्ग तुम्ही निवडला आहे, त्यास आक्षेप असल्याचे त्रिवेदी म्हणाले. रावण, कंस, दुयरेधन अहंकारी होते. त्यांची दुर्दशा झाली. त्यामुळे इतका अहंकार बरा नव्हे, असा सल्ला त्रिवेदी यांनी दिला.