आदित्य ठाकरेंचे छायाचित्र प्रचार फलकांवर

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र भाजपच्या फलकांवर नसल्याने संतापलेल्या युवा सेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजप खासदार पूनम महाजन यांनी तातडीने ‘मातोश्री’ निवासस्थानी धाव घेऊन उद्धव व आदित्य ठाकरे यांची रविवारी दुपारी भेट घेतली. युवा सेनेच्या नाराजीची लगबगीने दखल घेत विलेपार्ले येथे शनिवारी झालेल्या सभेतील बॅनरवर आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र लावले गेले.

युती झाली, तरी शिवसेनेला सन्मान दिला जात नसल्याचे निमित्त होऊन उत्तर मध्य मुंबईत खासदार पूनम महाजन यांच्यावर युवा सेनेचे कार्यकर्ते शनिवारी संतापले. महाजन यांच्या मतदारसंघातील फलकांवर आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र नसल्याने युवा सेनेचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होणार नाहीत, अशी भूमिका युवा सेनेचे कार्यकर्ते राहुल कनाल व इतरांनी घेतली. ते वांद्रे येथील शाखेमध्ये शनिवारी एकत्रही आले होते.   त्यामुळे महाजन यांनी शनिवारीच आदित्य ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली . त्यानंतर शनिवारी रात्री विलेपार्ले येथे झालेल्या युतीच्या प्रचारसभेतील बॅनरवर आदित्य ठाकरे व अन्य नेत्यांची छायाचित्रे झळकली. अन्य बॅनरवर असलेल्या छायाचित्रांमध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्थान होते. पण नवीन बॅनरवर छायाचित्रांच्या गर्दीत दानवे व इतरांची छायाचित्रे हरवली. पूनम यांनी रविवारी दुपारीच उद्धव व आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्यासमवेत पती वजेंडला राव, आमदार पराग अळवणी आदी होते.