महाराष्ट्राच्या राजकारणात २५ वर्षांपासून भाजपाचा सोबत असलेल्या शिवसेनेने पुढील वर्षीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. मात्र, आता शिवसेना किती जागा लढवणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर दुसरीकडे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्ष फक्त १०० जागांवरच लढणार आहे असे म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना ही माहिती दिली आहे. “आम्ही उत्तर प्रदेशातील एकूण ४०३ जागांपैकी १०० जागा लढवणार आहोत. दुसरीकडे, गोव्यात आम्ही २० जागांवर निवडणूक लढवू आणि युती करू शकतो,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये विजय रूपाणी यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की ही त्यांची अंतर्गत बाब आहे असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या उत्तर प्रदेशातील कार्यकारणीने आधी सर्व जागा लढवण्याची घोषणा केली होती त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश शिवसेना राज्य कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्ष सर्व ४०३ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना शेवटी किती जागांवर आपले उमेदवार उभे करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणुकांसंदर्भात एक पत्रक शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी जारी केलं होतं. या बैठकीसंदर्भातील माहिती देणारं पत्रक जारी करतानाच या पत्रकामधून शिवसेनेनं उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका केली. राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात निर्माण झाल्याचं सांगतानाच भाजपाला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.