मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान यांचा शपथविधी आज होण्याची शक्यता आहे. कमलनाथ सरकार कोसळल्याने आणि ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपात आल्याने भाजपाचं मध्यप्रदेशातील संख्याबळ वाढलं आहे. भाजपाने मध्यप्रदेशात लोकशाहीची हत्या केली असा आरोप करत कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कोण विराजमान होणार याची चर्चा रंगली होती. कारण शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतरही काही नावं चर्चेत होती. मात्र आज शिवराज सिंग चौहान यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मध्यप्रदेशात धुळवडीच्या दिवशी राजकीय भूकंप झाला. कारण ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ते भाजपात गेले. तसंच त्यांनी २२ आमदारही फोडले. या सगळ्या घडामोडींमुळे मध्य प्रदेशचं कमलनाथ सरकार अल्पमतात आलं. राज्यपाल लालजी टंडन यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याआधीच कमलनाथ यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. आता भाजपाचं संख्याबळ मध्यप्रदेशात वाढलं आहे. त्यामुळे साहजिकच कोण मुख्यमंत्री होणार याचे कयास लावले जात होते. अखेर शिवराज सिंग चौहान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे आणि त्यांचा शपथविधी आजच होण्याची शक्यता आहे.