एरवी राज्य आणि केंद्रातील परिस्थितीवरून भाजपवर सातत्याने टीकेचे आसूड ओढणाऱ्या शिवसेनेने आता गोव्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. भाजपशी बिनसल्यामुळे शिवसेना पहिल्यांदाच गोव्यातील निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. गोव्यातील भाजपचे स्टार प्रचारक असलेले केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून टोले लगावण्यात आले आहेत. मनोहर पर्रिकर हे सशाची शिकार करायची असेल तर वाघालाच मारायला चाललोय, अशी तयारी करून जातात, असा खोचक टोला सेनेकडून पर्रिकर यांना लगावण्यात आला आहे. एरवी शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोहर पर्रिकर यांनी गेल्या काही दिवसांत अनेक मुद्द्यांवर आक्रमकपणे भाष्य केले होते. नेमका हाच धागा पकडून सेनेने पर्रिकरांना लक्ष्य केले आहे. संरक्षणमंत्री मनोहरपंत पर्रीकर हे गोव्यातील अनेक मतदारसंघांत जोरदार भाषणे करीत आहेत. त्यांच्या भाषणांत गोमंतक कमी आणि पाकिस्तान जास्त आहे. दिल्लीत किंवा हिंदुस्थानच्या सीमेवर द्यायला हवीत अशी वीरश्रीयुक्त भाषणे पर्रीकर हे गोव्यातील म्हापसा, पेडणे, पणजी, सावर्डे, फोंडा अशा ठिकाणी देत आहेत. हे म्हणजे सशाची शिकार करायला जाताना वाघाला मारायला चाललोय असा आव आणण्यासारखे आहे. मनोहर पर्रीकरांना हे बाळकडू पुरेपूर मिळाले आहे, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.

याशिवाय, देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी कमीत कमी बोलावे पण जास्तीत जास्त कृती शांतपणे करावी, या संकेताची आठवणही सेनेकडून पर्रीकरांना करून देण्यात आली आहे. पण पाकिस्तानच्या बाबतीत राजकीय सभांतून बोलले की, टाळ्यांचा गजर होतो. लोकसभा निवडणूक काळातील नरेंद्र मोदी यांची भाषणे पाहिली की हे लक्षात येईल, असा उल्लेख करत सेनेने अप्रत्यक्षपणे भाजपच्या भाषणबाजीवर टीका केली आहे.

तसेच गोव्यातील स्थानिक गुन्हेगारीच्या मुद्द्यावरूनही सेनेने पर्रीकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. रशियन व नायजेरियन टोळ्यांनी गोव्यातील अनेक भागांचे स्वातंत्र्य व शांतता, कायदा आणि सुव्यवस्था विकत घेतली आहे. गोव्यातील नायजेरियन व रशियन ससे भलतेच मातले असून त्या सशांचा बंदोबस्त कसा करणार? , असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे. पाकिस्तान हासुद्धा वाघाचे कातडे पांघरलेला लांडगाच आहे आणि लांडग्याच्या तोंडास आपले रक्त लागले आहे. त्या लांडग्याचे डोके उडवा म्हणजे दुश्मनाच्या कानाखाली मारणारा माणूस दिल्लीत पाठवल्याचा अभिमान गोव्याच्या जनतेस वाटेल. मनोहर पर्रीकरांवर आमचेही प्रेम आहेच, पण लांडग्याचे तेवढे मुंडके छाटून आणा म्हणजे झाले. गोव्याच्या विधानसभा निवडणुका व पाकिस्तानचा प्रश्‍न वेगळा आहे हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे, असा खोचक टोलाही या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.