स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत केली आहे. दुपारी १२.२५ च्या दरम्यान शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत ही मागणी केली. ” स्पीकर महोदय आम्ही ही मागणी करतो की बिरसा मुंडा आणि वीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवावा” असं राजेंद्र गावित यांनी म्हटलं आहे.

१९ नोव्हेंबर रोजीच स्वातंत्र्य वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही असं केंद्र सरकारने एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं होतं. भाजपाच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंबंधी आश्वासन देण्यात आलं होतं. केंद्र सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. NDA तून बाहेर काढण्यात आल्याने शिवसेना विरोधी बाकांवर आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता पेचानंतर हा निर्णय एनडीएकडून घेण्यात आला होता. आता शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बिरसा मुंडा यांना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी केली आहे.

मागील अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होते आहे. १९ नोव्हेंबरला यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा यासाठी शिफारशीची गरज नाही असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. महाराष्ट्रात जो सत्तापेच निर्माण झाला आहे त्यावर तोडगा निघताना दिसतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सावरकर यांना भारतत्न देण्याची मागणी केली जाते आहे. मात्र या मागणीला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्ता स्थापन करु शकतात. अशात आता शिवसेनेने जी मागणी लोकसभेत केली आहे ते काँग्रेसला रुचणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.