एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी मारहाण केल्याचा मुद्दा आज लोकसभेत चांगलाच गाजला. शिवसेना खासदारांच्या गदारोळामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतर या मुद्द्यावर मोघम उत्तर देणाऱ्या नागरी हवाई उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांना शिवसेनेच्या खासदारांनी घेराव घातला. खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी उठवली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा थेट इशाराच शिवसेना खासदारांनी दिला.
तत्पूर्वी विमान कंपन्यांनी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घातल्यानंतरही त्यांनी आज लोकसभेच्या कामकाजात सहभाग घेतला. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी संसदेत माफीही मागितली. त्याचवेळी एअर इंडियाची आणि मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याची माफी मागण्यास त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच विमान प्रवासावर घातलेली बंदी उठवण्यात यावी, अशी विनंती सभागृहाला केली. अधिकाऱ्याच्या गैरवर्तणुकीमुळे हा प्रकार घडला, असे गायकवाड यांनी सांगितले. माझ्यावरील विमानप्रवासबंदी उठवण्यात यावी आणि माझ्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर शिवसेना खासदार अनंत गीते यांनी हा मुद्दा उचलून धरत आपला संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कोणतीही चौकशी न करता एका खासदारावर विमान प्रवास बंदी घातली जाते, हे अतिशय वाईट असल्याचे ते म्हणाले. त्यावर नागरी हवाई उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी उत्तर दिले. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. गायकवाड यांनी याप्रकरणी लेखी पत्र द्यावे. ते मी पोलिसांना पुढे पाठवतो. ती कायदेशीर प्रक्रिया आहे, असे मोघम उत्तर त्यांनी सभागृहात दिले. यावरून शिवसेना खासदारांनी संताप व्यक्त केला. सभागृहात त्यांनी गदारोळ केला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर शिवसेना खासदारांनी अशोक गजपती राजू यांना घेराव घातला. गायकवाड विमान प्रवास बंदीप्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देणाऱ्या राजू यांना त्यांनी जाब विचारला. त्याचवेळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यस्थी करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या सर्व गदारोळानंतर राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्षा महाजन आणि अशोक गजपती राजू यांच्यासोबत शिवसेना खासदारांची बैठक झाली. या विषयावर ठोस तोडगा काढण्याबाबत निर्णय झाला आहे. दरम्यान, १० एप्रिलपर्यंत या प्रकरणी तोडगा निघाला नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा शिवसेनेने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Air India will not lift the ban on Shiv Sena MP Ravindra Gaikwad, for now : Sources to ANI
— ANI (@ANI_news) April 6, 2017
Shivsena MP ravindra gaikwad, air india, airlines
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 3:17 pm