माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. या घटनेनंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्वराज यांना आदरांजलीही वाहिली आहे. त्यांच्या आठवणीही जागवल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एक फोटो फेसबुकवर पोस्ट करत सुषमा स्वराज यांचा पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकांचा बेत राहूनच गेला असे म्हटले आहे. चार दिवसांपूर्वी सुषमा स्वराज यांची भेट झाली होती तीच पोस्ट आणि फोटो संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे.

चार दिवसांपूर्वी आमची भेट झाली आहे. आमची भेट अत्यंत कौटुंबिक स्वरुपाची होती. अडीच ते तीन तास आम्ही छान गप्प मारल्या. संसदेचे कामकाज संपल्यावर पुरणपोळी आणि उकडीचे मोदक खायला येते असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं होतं. मुंबईतला पाऊस कमी झाला की दिल्लीतील घरी पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकाचा बेत करायचा ठरला होता. मात्र हा बेत अपूर्णच राहिला असं संजय राऊत यांनी सांगितलं.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी सुषमा स्वराज यांच्या राजकीय आठवणींनाही उजाळा दिला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पंतप्रधानपदाची पहिली पसंती सुषमा स्वराज याच नावाला होती. सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणातील मातृत्व हरपले असेही राऊत यांनी म्हटले आहे.