उपराष्ट्रपतीपदाची कारकीर्द संपताना हमीद अन्सारी यांनी केंद्र सरकारबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील मुस्लिम समाजात भितीचे वातावरण असल्याचे अन्सारींनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. यावरुन शिवसेनेने हमीद अन्सारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मुस्लिम समाजात भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे, मग याबद्दलची चर्चा त्यांनी आधी का केली नाही?,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

‘देशातील मुस्लिम समाजात असुरक्षितता आणि भितीची भावना आहे, मग हमीद अन्सारी यांनी उपराष्ट्रपतीचा राजीनामा आधीच का दिला नाही?,’ असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला आहे. ‘हमीद अन्सारी यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ आता संपला आहे आणि जाता-जाता ते या प्रकारची विधाने करत आहेत. त्यांनी याआधीच राजीनामा देऊन लोकांसोबत संवाद साधायला हवा होता,’ अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी अन्सारी यांच्या विधानावर कडाडून टीका केली.

देशातील मुस्लिम समाजामध्ये भितीचे वातावरण असल्याचे मत हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले होते. अन्सारी यांच्या या विधानावर हल्ला चढवताना ‘हा मुस्लिमांच्या अंतरात्म्याचा आवाज नाही. उत्तर प्रदेशातही मुस्लिम समाजाने भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे अशा प्रकारची विधाने करुन लोकांच्या मनात शंका निर्माण करु नका,’ असेदेखील राऊत यांनी म्हटले. याआधी भाजपचे प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनीही अन्सारी यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. ‘संपूर्ण जगात मुस्लिमांसाठी भारतासारखा चांगला देश नाही. मुस्लिमांसाठी हिंदूपेक्षा सर्वोत्तम मित्र असूच शकत नाहीत,’ असे हुसेन यांनी म्हटले होते.

मावळते राष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारच्या कामगिरीवर भाष्य केले. देशातील मुस्लिम समाजात आज भीती आणि असुरक्षिततेची भावना, असल्याचे आकलन योग्य आहे. देशातील वेगवेगळ्या प्रांतातून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा समाज अनेक जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन नांदणारा आहे. परंतु, सर्वांसाठी स्वीकार्यतचे हे वातावरण आता संकटात आहे. लोकांच्या भारतीयत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची प्रवृत्ती चिंताजनक असल्याची खंत अन्सारी यांनी व्यक्त आली आहे.