तोडा, फोडा आणि राज्य करा, हीच कॉंग्रेसची निती असून, त्याला आमचा कायमच विरोध आहे. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून तेलगू भाषिकांमध्ये एकमेकांत भांडण लावण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे. वेगळ्या तेलंगणाचे विधेयक संसदेत मांडण्यात आल्यास त्याला शिवसेना विरोध करेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले.
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत या दोन्ही नेत्यांनी वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या राजकारणावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, तोडा, फोडा आणि राज्य करा, हीच कॉंग्रेसची निती आहे. वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून तेलगू भाषिकांमध्ये कॉंग्रेसने लावलेले भांडण आता विकोपाला गेले आहे. त्यांच्या धोरणामुळे राज्य तुटतंय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारण करण्यासाठी कॉंग्रेस दोन्ही दगडांवर पाय ठेऊन राजकारण करीत आहे. आता हे दगड उचलून कॉंग्रेसच्याच डोक्यात घालण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
चंद्राबाबू नायडू म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकांमुळे केंद्र सरकार केवळ लेखानुदान मंजूर करणार आहे. अर्थसंकल्प नवनिर्वाचित सरकार निवडणुकीनंतर सादर करणार आहे. याचाच अर्थ सरकारला कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा नाहीये. मग आंध्र प्रदेशाचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणाची निर्मिती करण्याचा घाट का घातला जातोय. हा सुद्धा धोरणात्मक निर्णय नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही राज्याची निर्मिती करताना तेथील लोकांचे मत जाणून घेतले गेला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.