News Flash

“हिंदुत्वविरोधी कारवायांची उत्तरेत फॅक्टरी,” शिवसेनेचा योगी आदित्यनाथांवर निशाणा

"हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले"

संग्रहित (Express photo -Vishal Srivastav)

शर्जिल उस्मानीच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झाली असून कारवाईची मागणी केली जात आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल सुनावले असून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय श्री. फडणवीस यांना माहीत नाही? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले असंही सांगण्यात आलं आहे.

काय म्हटलं आहे संपादकीयमध्ये –
“कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. ‘एल्गार’ नावाची एक टोळधाड पुण्यात जमा केली जाते. त्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडकवीच केली जाते. नाव एल्गार, पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या. तो कोणीएक शर्जिल उस्मानी तेथे आला व त्याने आपल्या देशातले हिंदुत्व कसे सडले आहे यावर प्रवचन झोडले. त्यावर भाजपने आता आरोळय़ा ठोकायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वासाठी रस्त्यावर येऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. उस्मानी जे बरळला ते गंभीर आहे. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, असा आतडी पिळवटून टाकणारा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“विरोधी पक्षनेते तळमळीने सांगतात, ‘‘एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे, समस्त राज्याची चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे.’’ श्री. फडणवीस यांचे म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केलीत. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळय़ांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी 90 दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱ्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“रस्त्यावरचा शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आता त्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळय़ांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱयांचा सन्मान म्हणावा काय? या शेतकऱयांनी तर कोणताही गुन्हा केलेला नाही. भाजप पुढाऱयांनी रस्त्यावरच्या या हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल. हा जो कोणी शर्जिल हिंदुत्वावर शिंतोडे उडवून गेला त्यास पुण्यात आमंत्रित करणाऱ्यांवर सर्वप्रथम कठोर कारवाई केली पाहिजे. एल्गार परिषदेच्या निमित्ताने शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीचे लोक पुण्यात बोलवायचे व वातावरण बिघडवायचे, हीच त्यांची दुकानदारी आहे. शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीच्या बोकडांनी शिंतोडे उडवले म्हणून हिंदुत्वाचे तेज कमी होणार नाही, पण म्हातारी मेल्याचे दुःख नसून काळ सोकावत जातो,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“महाराष्ट्रात शिवसेना आहेच. सरकारचे सूत्रधार ठाकरे आहेत. त्यामुळे कायदा आहे तसा हाती दंडुकाही आहेच. म्हणूनच हिंदुत्वावर वाकडेतिकडे हल्ले कोणीच सहन करणार नाही. पण सवाल हा आहे की, या शर्जिलसारख्या हिंदुत्वद्रोही घाणीचा उगम होतो कोठून? त्याचे धागेदोरे शेवटी योगी राज्यातच जातात. हा शर्जिलही आता पळून उत्तर प्रदेशातील अलिगढला लपला आहे. महाराष्ट्राचे पोलीस अलिगढला जाऊन या शर्जिलच्या मुसक्या आवळतीलच, पण हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत आहे व तेथून तयार झालेला माल देशभरात जात असतो,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“हिंदुत्व विरोधकांच्या मुसक्या महाराष्ट्र आवळेलच, पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे. त्या पळून गेलेल्या व लपून बसलेल्या शर्जिलला महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्याची जबाबदारी त्यांची आहे व याकामी कोणी हस्तक्षेप करू नये. कारण महाराष्ट्राने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करावी व इतर राज्यांतील भाजप शासकांनी त्या गुन्हेगारांना विशेष सुरक्षा कवच बहाल करावे, असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना, ही शंका म्हणूनच आहे,” असं शिवसेना म्हणाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 7:52 am

Web Title: shivsena saamana editorial bjp devendra fadanvis sharjil usmani sgy 87
Next Stories
1 राहुल गांधी यांच्याकडून कारस्थान -भाजप
2 ट्विटरला केंद्राचा कारवाईचा इशारा
3 शेतकऱ्यांशी लढाई कशासाठी?
Just Now!
X