राज्यसभेतील आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत नाराज झाले आहेत. संजय राऊत यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं असून भाजपाप्रणित एनडीएवर जोरदार टीका केली आहे. आसनव्यवस्थेत बदल करत आपल्याला पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्यावरुन नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी भाजपाकडून माझा आणि शिवसेनेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे.

व्यंकय्या नायडू यांनी पत्रात लिहिलं आहे की, “मला वाटतं शिवसेनेच्या भावना जाणुनबुजून हा निर्णय कोणाकडून तरी घेण्यात आला आहे. तसंच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे”. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “मला आठवण करुन द्यायची आहे की, जेव्हा एनडीए विरोधात होतं तेव्हाही माझी ज्येष्ठता पाहता राज्यसभेत तिसऱ्या रांगेतच स्थान देण्यात आलं होतं. पण आता माझा आणि पक्षाचा अपमान करण्यासाठी जाणुनबुजून पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे”.

जागा बदलण्याचं नेमकं काय कारण आहे याचं उत्तर आपल्याला अद्यापही समजेलेलं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपल्याला तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात यावं अशी मागणी केली आहे. सभापतींनी कोणताही भेदभाव न करता निर्णय घेतले पाहिजेत असंही संजय राऊत यांनी पत्रात लिहिलं आहे.

आणखी वाचा- काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली चर्चा; सरकार आमचंच येणार : राऊत

संजय राऊत यांनी यावेळी शिवसेना अद्यापही अधिकृतपणे एनडीएचा भाग असल्याचं म्हटलं आहे. एनडीएमधून शिवसेना बाहेर पडल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.