काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांमी मोदी सरकारवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. राहुल गांधींनी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेल्या मुद्द्यांची उजळणी करत सर्वसमान्यांचा महाविरोधातील आक्रोश मोदी सरकारच्या कानापर्यंत पोहचत नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखामधून व्यक्त करण्यात आलीय. केंद्राने देश विकायला काढल्यानेच अर्थचक्र गतिमान झाल्यासारखं वाटत असल्याचा टोला या लेखातून लगावण्यात आलाय. इतकच नाही तर मोदी सत्तेत आल्यापासून काळा पैसा कमी होण्याऐवजी वाढल्याची टीकाही यातून करण्यात आलीय.

“देशाचे आर्थिक चित्र विदारक आहे व राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांत घसरलेल्या अर्थव्यवस्थेवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी महागाईसंदर्भात जी क्षेपणास्त्रे डागली आहेत, त्यामुळे सरकारची किल्लेबंदी ढासळून पडली आहे. इंधन दरवाढीने जनता त्रस्त असतानाच पुन्हा विनाअनुदानित गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला. कोटय़वधी लोकांच्या स्वयंपाकघरातील अर्थव्यवस्था त्यामुळे कोलमडली. घरगुती सिलिंडरची किंमत आता मुंबईसारख्या शहरात ८८४.५० रुपये होणार आहे. गेल्या आठवडाभरातली ही दुसरी वाढ आहे. भारतीय जनता पार्टीने दहा वर्षांपूर्वी महागाईविरोधी आंदोलन केले. त्यात रिकामी सिलिंडर्स घेऊन हेमा मालिनी, स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी वगैरे महिला मंडळ रस्त्यावर उतरले होते. देशातील कोटय़वधी महिला महागाईने त्रस्त झालेल्या असताना भाजपचे हे आक्रमक महिला मंडळ आता कोठे बसले आहे?”, असा सवाल लेखात विचारण्यात आलाय.

“राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीवर हल्ला चढवला आहे. ‘जीडीपी’तील वाढ म्हणजे विकास दरातील वाढ नव्हे, तर गॅस, डिझेल, पेट्रोलची दरवाढ (जीडीपी) आहे असे घाव गांधी यांनी घातले आहेत. सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे, पण आता या लुटमारीच्या विरोधात संपूर्ण देश एकत्र येत आहे. राहुल गांधी यांनी पुढे सांगितले आहे की, सरकारने गरीब-मध्यमवर्गीयांचे जगणेच नष्ट केले. यूपीएने सरकार सोडले तेव्हा व आताच्या पेट्रोलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६ टक्के वाढ झाली आहे तर डिझेलचे दर ५५ टक्के इतके वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव १०५ रुपये होता तो आता ७१ रुपये झाला. म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात ३१ टक्के घट होऊनही त्याचा लाभ आपल्या जनतेला होऊ शकला नाही. गॅसच्या किमतीतही २६ टक्के घट झाली आहे, पण येथेही जनतेला स्वयंपाकाचा गॅस महागच महाग करून ठेवला. डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ करून मोदी सरकारने 23 लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले. हे २३ लाख कोटी रुपये नक्की गेले कोठे, त्याचा हिशेब राहुल गांधी यांनी मागितला आहे,” असा उल्लेख लेखात आहे.

“एकटय़ा ऑगस्ट महिन्यातच ‘जीएसटी’ संकलन १.१२ लाख कोटींवर झाले आहे, पण हे सर्व सरकारी तिजोरीत जाते व बाहेर जनता मात्र महागाईने हवालदिल झाली आहे. सरकारमध्ये सामील असलेले नितीशकुमार व त्यांचा ‘जदयु’ यांनी महागाईविरोधात आवाज उठवला. दरवाढ मागे घ्या असे ते अत्यंत क्षीण आवाजात सांगत आहेत. जेथे जनतेचा महागाईविरुद्धचा आक्रोश मोदी सरकारच्या कानामध्ये पोहोचत नाही, तेथे हा क्षीण आवाज कसा पोहोचणार? मोदी सरकारचे म्हणणे असे आहे की, देशाचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. मात्र त्या गतिमान अर्थचक्रात गरीब, मध्यमवर्गीयांचे जगणे मंदावले आहे,” असा टोला लेखातून लगावण्यात आलाय.

“अर्थचक्र गतिमान का झाले, याची कारणे वेगळी आहेत. अनेक सार्वजनिक उपक्रम सरकारने विकायला काढले आहेत. त्या विक्रीतून सरकारच्या हाती पैसे खुळखुळत आहेत. विमा कंपन्या, राष्ट्रीय बँकाही खासगी लोकांच्या घशात घातल्या जात आहेत. सरकार जबाबदारीपासून पळ काढीत आहे. देशातील वातावरण उद्योग, व्यापार करावा असे राहिलेले नाही. आर्थिक लोकशाहीखेरीज राजकीय लोकशाही निरर्थक ठरली आहे. कोरोना व इतर निर्बंधांमुळे रोजगार संकटात आहेत, पण आर्थिक उद्योगक्षेत्रात दोनचार लोकांचीच मक्तेदारी असावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विमानतळ, रेल्वे स्थानके, विमा कंपन्या, तेल कंपन्या सरकारी मालकीच्या राहणार नसतील तर देशाचे स्वामित्व तरी राहील काय? या सर्व काळात महागाई अतोनात वाढली. लोक गरीब झाले, पण भारतीय जनता पार्टीच्या तिजोरीत शेकडो कोटींच्या देणग्या जमा झाल्या. ‘जीडीपी’ वाढीचा फायदा हा सत्ताधारी पक्षालाच झाला,” अशी टीका करण्यात आलीय.

“मोदींचे राज्य आल्यावर देशात आर्थिक परिवर्तन होईल असे वाटले होते. पण काळा पैसा कमी होण्याऐवजी तो वाढला व उद्योग-व्यवसाय करणारेच आपला देश सोडून पळून जाऊ लागले. देशाच्या अर्थव्यवस्थेचे आज वसाहतीकरण झाले आहे. देश चालविण्यासाठी कोणतेही नेते काही ताम्रपट घेऊन आलेले नाहीत. पंडित नेहरूंचा अर्थविषयक विचार आज विकायला काढला आहे. उद्या दुसरे लोक राज्यावर येतील. ते लोक नव्या पिढीचे असतील. देशाची लुटमार थांबवून नवा देश, नव्या अर्थव्यवस्थेची घडी निर्माण करतील. महागाईचा वणवा पेटलाय. त्यात लोकांच्या संतापाची ठिणगी पडत राहिली तर भडका उडायला किती वेळ लागेल? राहुल गांधी यांनी तेच अर्थशास्त्र समजावून सांगितले आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.