केंद्र सरकारमध्ये शिवसेना सत्तेत सहभागी असूनही या पक्षाचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांनी सरकारविरोधात बुधवारी लोकसभेत नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या विविध विकासकामांच्या कार्यक्रमांना आपल्याला खूप उशीरा निमंत्रित करण्यात येते, त्याचबरोबर शिष्टाचारानुसार मतदारसंघातील लोकप्रतिनिधीला कार्यक्रमात व्यासपीठावर बसविण्यात येते. मात्र, आपल्याला प्रेक्षकांमध्ये बसविण्यात आल्याची उदाहरणे देऊन त्यांनी अवमानास्पद वागणूक दिली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. सावंत यांची नाराजी लक्षात घेऊन लगेचच संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी संसद सदस्यांना असलेल्या अधिकाऱांबाबत राज्य सरकारांना आणि प्रशासकीय अधिकाऱयांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती उत्तरादाखल दिली.
आपला व्यथा मांडताना अरविंद सावंत म्हणाले, संसदेचे अधिवेशन सुरू असताना आम्हाला मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी बोलावले जाते. त्याचवेळी खूप उशीरा याबाबतचे निमंत्रण आम्हाला पाठविले जाते. शिष्टाचारानुसार निमंत्रणपत्रिकेवर संबंधित मतदारसंघातील लोकप्रतिनिधीचे नाव असायला हवे. मात्र, निमंत्रण पत्रिकेवर आमचे नावही छापण्यात येत नाही. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मला व्यासपीठावरही बसू दिले गेले नाही. प्रेक्षकांमध्ये बसण्याची सूचना मला अधिकाऱयांकडून करण्यात आली. काही अधिकारी जाणीवपूर्वक याबाबत राजकारण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आपलेच सरकार सत्तेत असताना अवमानास्पद वागणुकीमुळे आपण व्यथित झालो असल्याचे सांगत त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली.
यावर सभागृहात व्यंकय्या नायडू म्हणाले, सावंत यांच्या प्रमाणेच इतरही काही खासदारांनी आपल्याला अवमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रार केली आहे. केंद्र सरकारच्या विकासकामांच्या कार्यक्रमावेळी संसद सदस्याचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापलेच पाहिजे. त्याचबरोबर संबंधित सदस्याला व्यासपीठावर बसू दिले गेले पाहिजे. यासंदर्भात आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱयांना सूचना देऊ आणि या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.