शोभा डे या आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी चांगल्याच प्रसिद्ध आहेत. आता शोभा डे यांनी मोदी सरकारविरोधात असेच काही वादग्रस्त ट्विट केले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. लोकसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. यावरच निशाणा साधत शोभा डे यांनी एक वादग्रस्त ट्विट केला आहे. चोली के पिछे क्या है हा प्रश्न विचारण्याऐवजी आता कमळाच्या खाली काय आहे हा प्रश्न विचारा. कमळाच्या खाली चिखल असतो हे आपल्याला ठाऊक आहेच अशा आशयाचे एक ट्विट केले आहे. हे ट्विट करतानाच शोभा डे यांनी एक वृत्तपत्राचे कटिंग त्यात टॅग केले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कमळाची पाकळी उचलून त्याखाली असलेली काळी बाजू पाहात आहेत.

कैराना येथील पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला त्यावरूनही शोभा डे यांनी भाजपावर टीका केली आहे. या पराभवासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत असे त्यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळात काय कामे केली? फेविकॉल चीफ मिनिस्टरशिप असे म्हणत त्यांच्यावरही डे यांनी टीका केली. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्याबाबतही त्यांनी एक ट्विट केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दिवसांसाठी भारतात आल्याबद्दल स्वागत करत आहेत अशा आशयाचा एक खोचक ट्विट शोभा डे यांनी केला. शोभा डे यांच्या ट्विटचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तुमच्याकडून चांगल्या प्रतिक्रियेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर चोली के पिछे और कमल के निचे क्या है वह देखते रहिये, असे दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे. शोभा को शोभा नहीं देते ऐसे ट्विट्स असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे.