गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ८ सप्टेंबर रोजी प्रद्युमन ठाकूर या मुलाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत प्रद्युमनचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून रक्तस्त्राव आणि मानसिक धक्क्यामुळे प्रद्युमनचा मृत्यू झाल्याचे कारण या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

एका बाजूने धार असलेल्या शस्त्राने गळ्यावर झालेला वार खोलवर गेला होता. त्यामुळेच रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील शुक्रवारी म्हणजेच ८ सप्टेंबरला प्रद्युमन ठाकूरचा मृतदेह रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात आढळला होता. ही हत्या बस कंडक्टरने केल्याची माहिती समोर आली होती ज्यानंतर २४ तासांच्या आत अशोक कुमार या कंडक्टरला अटक करण्यात आली.

हत्या झाल्याच्या दिवसापासून रायन इंटरनॅशनल स्कूल बंद आहे. सोमवारपासून शाळा सुरु होईल आणि यापुढे सुरक्षेचे सगळे निकष बारकाईने पाळले जातील, अशी अपेक्षा आहे असे गुरुग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त विनय प्रताप सिंह यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

शुक्रवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रद्युमनच्या खून प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रद्युमनचा मृतदेह ताब्यात घेतल्यापासूनच त्याच्या आई वडिलांनी आणि इतर संतप्त पालकांनी या खुनाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली होती. त्यासाठी ८ सप्टेंबरपासून आंदोलनही केले. अखेर शुक्रवारी आंदोलकांची मागणी करत मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशी दिले. प्रद्युमनचे वडिल वरूण ठाकूर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.