बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी माझे नाव जोडून माध्यमांनी विपर्यास केल्याचे सांगत झाकिर नाईकने आपण दहशतवादाला कधीच पाठिंबा दिलेला नसल्याची भूमिका मांडली. बांगलादेशमधील हल्लेखोरांनी धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या शिकवणीपासून प्रेरणा घेतल्याची बाब निदर्शनास आली आहे. यापार्श्वभूमीवर झाकिर नाईकने एक निवेदन जारी केले असून, यामध्ये त्याने दहशतवादी कारवायांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

वाचा: झाकीर नाईकच्या उपदेशांच्या तपासासाठी नऊ पथके

माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांनी मला धक्काच बसला. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादाशी माझे नाव जोडले जात आहे. ही खूप धक्कादायक बाब आहे. मी दहशतवादाला कधीच पाठिंबा दिलेला नाही. माझ्या माहितीनुसार, माध्यमं हे जगातील सर्वात मोठे शस्त्र आहे. एखाद्या खलनायकाला नायक आणि नायकाला खलनायक करण्याची ताकद माध्यमांमध्ये आहे. टेलिव्हिजनवर माझ्या काही निवडक आणि अर्धवट व्हिडिओ क्लिप्स दाखवून दिशाभूल केली जात आहे. टेलिव्हिजन किंवा प्रिंट माध्यमांसाठी मुलाखती देण्यास काहीच हरकत नसते. पण मी मांडलेले मत जसेच्या तसे न वापरता दुसऱयादिवशी वेगळेच वळण देऊन छापले जाते. याची मला भिती वाटते, असेही जाकिरने निवेदनात म्हटले आहे.

वाचा: झाकीर यांच्या भाषणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

दरम्यान, झाकिरच्या भारतात परतण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतात सध्या सुरू असलेल्या वादामुळे झाकिरने भारतात परतण्याचा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. झाकीर नाईक चालवत असलेल्या पीस टीव्ही या वादग्रस्त वाहिनीवर बांगलादेश सरकारने बंदी घातली आहे. बांगलादेश सरकारच्या या निर्णयावर देखील त्याने नाराजी व्यक्त केली आहे.