करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या काळात संशयित रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण पडतो आहे. तरीही या खडतर काळात देशातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर आपलं काम करत आहेत. मात्र काही भागांत तपासणीसाठी जाणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांच्या पथकावर नागरिक हल्ला करत असल्याच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील मोरारबाद येथे हाजी नेब मशिद भागात तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टर आणि पोलिसांवर स्थानिक नागरिकांनी दगडफेक केली.

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकारात, रुग्णवाहिका आणि काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टरांवर काही लोकांनी बाहेर येऊन जोरदार हल्ला चढवला, ज्यात काही अधिकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती रुग्णवाहिकेच्या चालकाने दिली आहे.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, मोरारबाद भागात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर त्याच्या परिवारातील लोकांना क्वारंटाइन करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या परिवाराची तपासणी करुन त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर येखील नागरिकांनी दगडफेक करत हल्ला केला, ज्यात काही डॉक्टरांनाही गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या परिवारात करोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला ती लोकं क्वारंटाइन होण्यासाठी तयार होती. मात्र इतर लोकांनी याला विरोध करत दगडफेकीला सुरुवात केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून सर्व आरोपींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे.