राजधानी दिल्लीतील एका रहदारीच्या रस्त्यावरील धक्कादायक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका कार चालकाला अडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न चालकाने केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या अंगावर शहारे येऊ शकतात. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे.

दक्षिण दिल्लीतील धौला कौन कॅन्टोन्मेट भागात सोमवारी ही घटना घडली असून फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका कार चालकाला कॉन्स्टेबल महिपाल सिंह यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते त्या कारच्या समोर उभे राहिले. मात्र, कार चालकाने कारचा वेग वाढवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कारच्या बोनेटवर उडी घेऊन स्वतःला काही काळ धरुन ठेवले. रहदारीच्या या रस्त्यावर कारचालक त्यांना खाली पाडण्यासाठी झिगझॅग पद्धतीने कार चालवण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, सुमारे ४०० मीटरपर्यंत थरारक पद्धतीने कार चालकाने त्यांना ढकलत नेले. त्यानंतर त्यांची पकड ढिली झाल्याने ते रस्त्यावर पडले.

त्यानंतर पोलिसांनी पुढे एक किमीपर्यंत त्या कारचालकाचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. हा आरोपी कार चालक दक्षिण दिल्लीतील उत्तम नगर येथील रहिवासी असून त्याच नाव शुभम आहे. त्याच्यावर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.