तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या रस्तावरील एक नाट्यमय व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये कॉलेजच्या तरुणांचा ग्रुप एका बसच्या टपावरुन अचानक खाली पडल्याचे दिसते. क्षणभर हा व्हिडिओ थरकाप उडवणारा वाटत असला तरी तो नाट्यमयरित्या घडला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ‘बस डे’ साजरा करण्यासाठी पचईय्यप्पा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा प्रताप केला आहे.

या व्हिडिओमध्ये कॉलेजच्या तरुणांचा एक ग्रुप धावत्या बसच्या टपावर बसून घोषणाबाजी करताना तसेच नाचताना दिसत आहे. तसेच काही विद्यार्थी खिडकीच्या बारला पकडून लटकताना दिसत आहेत. त्यानंतर एक दुचाकी समोर आल्याने अचानक या बसला ब्रेक लागतो आणि हे विद्यार्थी थेट बसच्या टपावरुन बसच्यासमोर रस्त्यावर वस्तू पडल्याप्रमाणे पडतात. यामध्ये काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चेन्नई पोलिसांनी त्यावर आक्षेप घेतला असून अशा प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण करीत धोकायदायक कृत्य केल्याप्रकरणी संबंधीत विद्यार्थ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे एखाद्या ‘डे’ चे सेलिब्रेशन होऊ शकत नाही, असे सांगताना पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतले आहे.