देशभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका मॉडेल आणि ब्लॉगरने सोशल मीडियावरुन तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार उघड केला आहे. इंदूरमध्ये दिवसाढवळया वर्दळीच्या रस्त्यावर दोन आरोपींनी या मॉडेलचा विनयभंग केला.

ही मॉडेल तिची स्कूटर चालवत असताना दोन अज्ञात आरोपींनी तिचा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या अपघातात ही मॉडेल जखमी झाली असून तिने टि्वटरवरुन ही संपूर्ण घटना कथन करताना जखमी झाल्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची या घटनेची गंभीर दखल घेतली असून लवकरात लवकर आरोपींना अटक होईल असे सांगितले आहे.

मी स्कूटर चालवत असताना दोघांनी ‘दिखावो इसके नीचे क्या हैं’ असे म्हणत माझा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना माझा तोल जाऊन मी स्कूटरवरुन खाली पडले. इंदूरमधल्या वर्दळीच्या रस्त्यावर हा संतापजनक प्रकार घडला. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या कोणीही आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला नाही असे या मॉडेलने सांगितले.

या घटनेने मी सुन्न झाले आहे. गुन्हा करणारे पळून गेले. मी त्यांच्या गाडीचा नंबरही पाहू शकले नाही. इतेक मला असहाय्य कधीच वाटले नव्हते. फक्त बसा आणि बघा असा माझा स्वभाव नाहीय. ते पळून गेले पण मी काही करु शकले नाही. मी काय घालावे हा माझा प्रश्न आहे. मी स्कर्ट घातला म्हणून माझ्याबरोबर असं वागण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? असा सवाल या मॉडेलने केला आहे.

मी खाली पडल्यानंतर एक काका माझ्या मदतीला आले. मी स्कर्ट घातला होता म्हणून माझ्याबरोबर असा प्रकार घडला असे त्यांनी सांगितले. समजा मी त्या वर्दळीच्या रस्त्यावर नसते, एखाद्या निर्जन रस्त्यावर असते तर काय घडले असते, कल्पना करा असे या मॉडेलने म्हटले आहे.