News Flash

धक्कादायक! कोटातील रुग्णालयात महिन्याभरात १०० बालकांचा मृत्यू; राजकारण तापलं

राजस्थान सरकार या मुद्द्यावर गंभीर असून यावर कोणीही राजकारण करु नये - अशोक गेहलोत

प्रतिनिधिक छायाचित्र

राजस्थानमधील जे. के. लोन रुग्णालयात महिन्याभरात सुमारे १०० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांतच ९ बालकांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाने आता गंभीर स्वरुप धारण केले आहे. यावरुन राजकारणही तापायला सुरुवात झाली आहे. भाजपाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना टार्गेट केले आहे. त्याचबरोबर बसपा प्रमुख मायावती यांनी देखील मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याभरात या रुग्णालयात ७७ बालकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी ४ आणि ३१ डिसेंबर रोजी ५ बालकं या रुग्णालयात उपचारांदरम्यान दगावली आहेत. जन्मावेळी वजन कमी असल्याने हे मृत्यू झाले असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले आहे. दरम्यान, राजस्थान सरकारने मंगळवारी या मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या सर्व वैद्यकीय उपकरणांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “एका महिन्यांत १०० नवजात बालकांचा मृत्यू होतो आणि राजस्थानचे मुख्यमंत्र्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. कोटा इतकंही दूर नाही की सोनिया आणि राहुल गांधी इथं पोहोचू शकत नाहीत. तसेच ही घटना इतकीही साधारण नाही की मीडियानं काँग्रेस सरकारच्या या बेपरवाईकडे डोळेझाक करावी.”

केंद्राकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले की, “मी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. आमच्याकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल असे त्यांना अश्वस्तही केले आहे. यंदा या रुग्णालयात बालकांचे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण हे गेल्या काही वर्षांतील मृत्यूंपेक्षा अधिक आहे.”

सरकार घटेनेबाबत गंभीर, कोणीही राजकारण करु नये – अशोक गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात ट्विटद्वारे आपली भुमिका स्पष्ट केली आहे. “राजस्थान सरकार या मुद्द्यावर गंभीर असून यावर कोणीही राजकारण करु नये. केंद्राचे एक पथक इथे भेटीवर आले असून बालकांचे मृत्यू थांबावेत त्यासाठी वैद्यकीय सुविधा सुधारावी यासाठी ते काही सूचना करतील, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 2:15 pm

Web Title: shocking of 100 children died in a month in hospital in kota aau 85
Next Stories
1 पत्नी माहेरी गेली म्हणून नवऱ्याने स्वत:चे गुप्तांग कापले
2 आपण मुलांना कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये शिकवतो त्यामुळे ते गोमांस खातात – गिरिराज सिंह
3 VIDEO: पोप फ्रान्सिस यांनी मागितली महिलेची माफी
Just Now!
X