तामिळनाडूत शेतकऱ्यांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिंडीगुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी बँकांकडून मिळालेल्या धनादेशामुळे खळबळ उडाली आहे. काही शेतकऱ्यांना ५ तर काहींना १० रूपयांचे धनादेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारनेही अशी प्रकरणे समोर आल्याचे मान्य केले आहे. सरकारने विमा कंपन्यांना चूक सुधारण्याच्या सूचना केल्या आहेत.

माजी मंत्री आणि द्रमुक नेते पिचंडी यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करताच एकच गदारोळ सुरू झाला. दिंडीगुलच्या शेतकऱ्यांना गेल्यावर्षी पिकांचे नुकसान झाल्यामुळे विमा कंपन्यांकडून ५ आणि १० रूपयांचे धनादेश देण्यात आल्याचा आरोप पिचंडी यांनी केला. ते म्हणाले, करूपसामी या शेतकऱ्याने एका एकरसाठी १०२ रूपया विमा हप्ता भरल्यानंतर त्याला १० रूपयांची रक्कम देण्यात आली. थिरूमलाईस्वामीकडून एका एकरसाठी ५० रूपयांचा विमा हप्ता घेण्यात आला. त्याला ५ रूपयांचा मोबदला देण्यात आला.

पीक विमा अंतर्गत नुकसान झालेल्या पिकापोटी एका एकर भात पिकासाठी २६ हजार रूपये, डाळींसाठी १२ हजार आणि बाजरीसाठी २० हजार रूपये मोबदला द्यावे लागतात. शेतकऱ्यांना मिळालेल्या ७ आणि १० रूपयांचे धनादेश पिचंडी यांनी सभागृहात दाखवले.

कृषि मंत्री दोराइकन्नू यांनी आरोपावर सरकारची बाजू मांडली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे सहकार मंत्री राजू यांनी दिंडीगुल आणि नापट्टीनम येथे अशी प्रकरणे समोर आल्याचे मान्य केले. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकरणांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.