देशात सध्या करोना संसर्गाचे प्रमाण कमी झालेले असले तरी अद्यापही दररोज करोनाबाधित आढळून येतच आहे. तसं पाहिलं तर करोना चाचणीची प्रक्रिया फार कमी वेळाची असते, मात्र त्यात जर संबंधित काही चूक झाली, तर ती तपासणी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीसाठी प्रचंड वेदनादायी ठरते. अशीच एक घटना तेलंगणामधील करमीनगर येथे शुक्रवारी घडल्याचे समोर आले आहे.

करीमनगरमधील रामदुगु मंडलातील वेंकटरोपल्ली गावाचे सरपंच जुवाजी शेखर हे स्वतःची करोना चाचणी करण्यासाठी गेले होते. यावेळी चाचणी दरम्यान स्वॅब स्टिक नाकातच तुटली आणि ती संरपंचांच्या घशात जाऊन अडकली, यामुळे सरपंचांना असह्य वेदना सुरू झाल्या होत्या.

इंडिया टुडेने या संदर्भात दिलेल्या वृतामध्ये सांगितले आहे की, ही घटना शुक्रवारची आहे. गावात रॅपिड अॅन्टिजेन टेस्टसाठी सरपंच जुवाजी शेखर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना गावकऱ्यांसाठी रोल मॉडेल बनायचं होतं म्हणून त्यांनी सर्वात अगोदर स्वतःची तपासणी करून घेण्याचे ठरवले, मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरला. कारण, त्यांच्या नाकात जेव्हा स्वॅब स्टिक टाकण्यात आली, तेव्हा ती नाकातच तुटली आणि त्यांना प्रचंड वेदना सुरू झाल्या.

या प्रकारानंतर डॉक्टर व परिचारिकांनी त्यांच्या नाकातील तुटलेली स्टिक काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. दुसरीकडे सरपंचांना असह्य वेदना होत असल्याने त्यांची प्रकृती बिघडू लागली, अखेर त्यांना करीमनगरमधील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले व तिथं एंडोस्कोपी करून स्वॅब स्टिक काढली गेली. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, स्वॅब स्टिक नाकातून घसरून घशात जाऊन अडकली होती. ती, एंडोस्कोपीकरून ती काढण्यात आली आहे. या प्रकारामुळे सरपंच जुवाजी शेखर यांनी गावातील अप्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार देखील केली आहे.