ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर बारगढ येथील एका जनसभेत बूट भिरकावण्यात आला. मात्र सुरक्षारक्षकांनी घेतलेल्या सावधगिरीमुळे पटनायक यांना कोणतीही इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार नवीन पटनायक बिजापूर येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेसाठी गेले होते. रिता साहू यांच्या प्रचारसभेत ते बोलत आहेत. ते बोलत असतानाच त्यांच्यावर एका माणसाने दोनवेळा बूट भिरकावला. मात्र त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी तातडीने पटनायक यांना तिथून हलवले. ज्यामुळे पटनायक यांना कोणतीही इजा झाली नाही तसेच बूटही लागला नाही.

बूट फेकणाऱ्या माणसाला सभेत बसलेल्या लोकांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने पकडले. तसेच त्याला त्याच्या कृत्याबद्दल मारहाण केली. ज्यामध्ये हा बूट फेकणारा माणूस जखमी झाला. त्याला बारपाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

याआधी ओदिशाच्या बालासोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नवीन पटनायक यांच्यावर एका महिलेने अंडे फेकले होते. हे अंडे पटनायक यांच्यापर्यंत पोहचले नाही. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आणि समज देऊन सोडून दिले. मयुरभंज येथील एका रॅली दरम्यान पटनायक यांच्यावर एका तरुणाने अंडे फेकले होते. त्यानंतर मंगळवारी झालेल्या जनसभेत दोनवेळा बूट फेकण्यात आला.