पश्चि्म बंगालमध्ये भाजपा व तृणमूल काँग्रेसमधील वाद अद्यापही सुरूच आहे. आज(सोमवार) भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात कोलकातामध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, वटगंज भागातून हा रोड शो जात असताना, कैलाश विजयवर्गीय व मुकूल रॉय यांच्या वाहनावर बूट फेकण्यात आला. मात्र यामुळे रोड शो वर कुठलाही परिणाम झाला नाही, तो सुरूच राहिला.

टीएमसी कार्यकर्त्यांनीच बूट फेकला आहे, असा भाजपाकडून आरोप करण्यात आला आहे. तर, टीएमसी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की भाजपा समर्थक मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबद्दल अपशब्द वापरत होते. दरम्यान, घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलिसांची फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे भाजपाच्या आजच्या रोड शो साठी अगोदर कोलकाता पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र नंतर काही अटींसह परवानगी देण्यात आली होती. भाजपा रोड करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितलं होतं.

या रोड शो मध्ये कोलकात्ताचे माजी महापौर शोभन चटर्जी सहभागी होणार होते मात्र ते आले नाही. या रोड शो चे नेतृत्व कैलाश विजयवर्गीय, मुकूल रॉय व खासदार अर्जुन सिंह यांनी केले. किड्डरपोर भागात भाजपा व टीएमसी कार्यकर्ते समोरासमोर आले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती सांभाळली.

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर तुफान दगडफेक

या अगोदर डिसेंबर महिन्यात भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील गाड्यांवर हल्ला करण्यात आला होता. जे पी नड्डा यांच्या वाहनांवर दगडफेक झाली होती. त्यावेळे कैलाश विजयवर्गीय हे जखमी देखील झाले होते.

पश्चिम बंगाल – भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांना आता ‘झेड’ सुरक्षा, बुलेटप्रुफ कार

यानंतर कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. त्यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्या आली आहे, शिवाय, त्यांना बुलेटप्रुफ गाडी देखील देण्यात आलेली आहे. या अगोदर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती.