X

‘बंडखोर महिलांच्या गुप्तांगावर गोळ्या घाला’

सैनिकांसमोर मुक्ताफळं उधळली

बंडखोर महिलांच्या गुप्तांगावर गोळ्या घाला, असं वादग्रस्त आणि तितकंच बेजबाबदार वक्तव्य फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्टी यांनी केलं आहे. त्याच्या या आक्षेपार्ह विधानामुळे जगभरातील महिलांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. यातून राष्ट्राध्यक्षांची हीन मानसिकता दिसून येत असून ते देशातील नागरिकांना स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी अधिक भडकवत असल्याचा आरोप महिला संघटनांनी केला आहे.

गेल्याच आठवड्यात २०० सैनिकांना संबोधित करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. ‘बंडखोर महिलांना सांगा की आम्ही तुम्हाला मारून टाकणार नाही पण, त्याऐवजी तुमच्या गुप्तांगावर गोळ्या घालू कारण योनीशिवाय स्त्रीला महत्त्व नाही. ही मेयर कडून आज्ञा आली असल्याचंही त्यांना सांगा’ अशी मुक्ताफळं त्यांनी सैनिकांसमोर उधळली. एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार रॉड्रिगो यांचे वादग्रस्त वक्तव्य ऐकून सैनिक चिडण्याऐवजी हसून त्यांना दुजोरा देत होते. द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार हे भाषण छापण्यासाठी देताना त्यातून ही वादग्रस्त विधाने हटवण्यात आली. एका अमेरिकन वृत्तपत्राच्या माहितीनुसार रॉड्रिगो हे महिलांचा अपमान करण्यास, त्यांना धमकावण्यात कधीही कचरत नाहीत. त्यांच्याकडून वारंवार महिलांवर अशी आक्षेपार्ह शेरेबाजी केली जाते.

रॉड्रिगो अशी बेजबाबदार विधान करत महिलांविरोधी प्रवृत्तीला अधिक खतपाणी घालत आहे, त्यांच्या या विधानांमुळे महिलांविरोधातील अत्याचार वाढले असून असंख्य महिला अत्याचाराला बळी पडत असल्याचं तिथल्या महिला हक्क संघटनेचं म्हणणं आहे.

  • Tags: Philippines president Duterte,