इटलीत नवे आघाडी सरकार सत्तेची सूत्रे हाती घेत असतानाच शासकीय कार्यालयाबाहेर झालेल्या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. इटलीतील राष्ट्रपतींच्या प्रासादापासून अवघ्या एक कि.मी. अंतरावर ही दुर्घटना घडली.
दोन महिन्यांच्या घटनात्मक पेचप्रसंगानंतर आणि आर्थिक मंदीच्या झळा बसत असताना पंतप्रधान एन्रिको लेट्टा यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा शपथविधी होत होता. ४६ वर्षीय पंतप्रधान लेट्टा हे युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांमधील तुलनेने तरुण पंतप्रधानांपैकी एक मानले जातात. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनामध्ये ते नवे आर्थिक धोरण जाहीर करतील अशी अपेक्षा होती. इटलीत सध्या बेरोजगारीने डोके वर काढले असून तेथे बेरोजगारीचा दर ११.७ टक्के आहे. या समस्येवर उपाययोजना केली जाईल, अशी अपेक्षा असतानाच लेट्टा यांच्या शपथविधीनजीक हा हल्ला करण्यात आला.
हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जखमी झाला असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.