23 July 2019

News Flash

न्यूझीलंडमध्ये मशिदींत अंदाधुंद गोळीबार, 49 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार झाला आहे

न्यूझीलंडमध्ये  दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.  ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार करण्यात झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली असून ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस प्रमुख माईक बुश यांनी दिली.

पोलिसांनी ख्राईस्टचर्च येथे गंभीर परिस्थिती निर्माण झालं असल्याचं आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मशिद अल नूर येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम जमलेले होते. यामध्ये बांगलादेश क्रिकेट संघदेखील होता. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू सुरक्षित आहेत.

एका साक्षीदाराने stuff.co.nz ला दिलेल्या माहितीनुसार आपण प्रार्थना करत असताना गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. बाहेर येऊन पाहिलं असता आपली पत्नी रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेली होती. दुसऱ्या एका व्यक्तीने आपल्या मुलांवर गोळीबार होताना पाहिल्याचं सांगितलं. माझ्या आजुबाजूला सगळीकडे मृतदेह होते असंही त्यांनी सांगितलं.

हल्लेखोराने लष्कर जवानांसारखे कपडे परिधान केले होते अशी माहिती आहे. मात्र अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान गोळीबारानंतर परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून लोकांना घराबाहेर न येण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रवक्त्याने संपूर्ण संघ सुरक्षित असून त्यांना मानसिक धक्क्यात असल्याची माहिती दिली आहे. सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आलं आहे.

First Published on March 15, 2019 8:32 am

Web Title: shooting at a mosque in new zeland